डोंबिवली- महावितरणच्या फिल्डवर कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या स्पर्धा आयोजित केल्या असून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार या नाट्यस्पर्धा होत आहेत. कलेमुळे मानवी आयुष्य अर्थपूर्ण होत असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यातील कला जपावी तसेच सहभागी कर्मचाऱ्यांनी आपली सर्वोत्तम कला सादर करावी, असे मत महावितरणचे कार्यकरी संचालक (मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे यांनी व्यक्त केले. आचार्य अत्रे नाट्य रंगमंदिर, कल्याण येथे आयोजित नाट्यस्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक श्रीकांत जलतारे उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) संदेश हाके, कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता रफिक शेख, रत्नागिरी परिमंडलाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजेंद्र पांडे व आयोजन समितीचे प्रमुख तथा अधीक्षक अभियंता सुनील काकडे उपस्थित होते. तसेच महावितरण कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय व नाट्यरसिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्रीकांत जलतारे म्हणाले, “या नाट्य महोत्सवामुळे कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामात अधिक सकारात्मक बदल होऊ शकतो. त्यामुळेच सर्वांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा.”
नाट्यस्पर्धेची सुरुवात भांडूप नागरी परिमंडलाच्या 'ती रात्र' या नाटकाने झाली. याचे लेखन हेमंत एदलाबादकर यांनी तर दिग्दर्शन डॉ.संदीप वंजारी यांनी केले आहे. या नाटकाची मांडणी सायको-सस्पेन्स पद्धतीने करण्यात आली होती. एखादी घटना मानवी मनात कशी घर करून राहते व मानवी आयुष्यावर त्याचे कसे बरे-वाईट सुप्त परिणाम होत असतात याची सुंदर मांडणी या नाटकात करण्यात आली होती. दुपारी ०२.०० वाजता नाशिक परिमंडलाचे 'झोपा आता गुपचूप' हे नाटक सादर झाले. या नाटकाचे लेखन अशोक पाटोळे यांनी व दिग्दर्शन रेणुका भिसे यांनी केले आहे. प्रत्येकाने स्वप्ने पहावीत पण कोणत्याही गोष्टीचा हव्यास करू नये, या आशयाची अंतर्मुख करणारी मांडणी या नाटकाद्वारे सादर करण्यात आली. सायंकाळी 'सोरगत' हे उषा परब लिखित कोकण परिमंडल रत्नागिरी यांचे नाटक सादर झाले. एका छोट्याशा खेड्यात लग्नासाठी मुलगी पाहायला आलेले लोक, म्हैस विकण्यासाठी गिऱ्हाईकाची वाट पाहणाऱ्याच्या घरात जातात. या गैरसमजातून होणारे विनोद मालवणी शैलीत खुमासदार पद्धतीने मांडले होते.
बुधवारी प्रकाशगड या सांघिक कार्यालयाचे 'अशुद्ध बीजापोटी' हे नाटक सादर होणार आहे. या नाटकाचे लेखन केदार देसाई यांनी तर दिग्दर्शन विनोद गोसावी यांनी केले आहे. दुपारी ०२.३० वाजता कल्याण परिमंडलाचे 'तथास्तु' हे डॉ.संतोष बोकेफोडे लिखित व दिग्दर्शित नाटक सादर होईल. सायंकाळी ०५.३०वाजता स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोहळा होणार आहे. नाट्यस्पर्धा सर्वांसाठी खुली असून रसिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा व महावितरणच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी केले आहे.