ठाणे : महावितरण व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात वीज बिल भरणा केंद्राबाबतीत नुकताच करार झाला आहे. या करारानुसार महावितरणच्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील वीज ग्राहकांना आता ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुमारे १०१ शाखांत वीज बिल भरणा करता येणार आहे. १ ऑगस्ट पासून सुरु झालेल्या या सुविधेचा लाभ महावितरणच्या ठाणे, कल्याण-१, कल्याण-२, वाशी, वसई, पालघर या सर्कलच्या कार्यक्षेत्रातील अंदाजे ५० हजाराहून अधिक ग्राहकांना होणार आहे.
यापूर्वी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फात सन २०१५ पर्यंत वीज बिल भरणा स्वीकारला जात होता. त्यानंतर काही प्रशासकीय कारणास्तव वीज बिल भरण्याची ही सुविधा बंद झाली होती. मात्र आता १ऑगस्ट पासून ही सेवा नव्या पद्धतीने म्हणजेच ऑनलाईन कॅश कलेक्शन सिस्टमद्वारे सुरु झाली आहे. सध्या या दोन्ही जिल्ह्यातील सुमारे ४३ लाख ग्राहक, ६६०हुन अधिक सहकारी बँक, सोसायटी, महावितरणची कार्यालयातील केंद्रे तसेच मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून वीज बिल भरणा करतात. आता यामध्ये नवीन १०१ केंद्राचा समावेश झाला आहे. याचबरोबर महावितरणचे संकेत स्थळ व मोबाईल अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन वीज बिल भरण्याकडेही ग्राहकांचा कल वाढत आहे.
महावितरणच्या या नवीन १०१ वीज बिल भरणा केंद्रामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागातील ग्राहकांना लाभ होणार आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, सफाळा या तालुक्यातील गावांना तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, व कसारा या परिसरातील ग्राहकांना वीज बिल भरणे सोयीचे होणार आहे. ''नव्याने सुरु झालेल्या या १०१ केंद्रांमुळे ग्राहकांना वेळेत वीज बिल भरणा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ ग्राहकांनी घ्यावा.'' असे आवाहन कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक श्रीकांत जलतारे यांनी केले आहे.