डोंबिवली, दि. 12 - विजेची वायर अंगावर पडून मृत्युमुखी पडलेल्या जितेंद्र तिवारीच्या कुटुंबीयांना महावितरणतर्फे अवघ्या ५० हजारांचे अर्थसहाय्य करण्यात आले असून ही तर त्या दु:खी कुटुंबीयांची थट्टा आहे. त्यांच्या कुटुंबीयांपैकी मयत जितेंद्रच्या पत्नीला अथवा मुलांना महावितरणमध्येच नोकरीची हमी द्यावी, असे पत्र भाजपाचे डोंबिवली ग्रामीणचे अध्यक्ष आणि केडीएमसीचे नगरसेवक महेश पाटील यांनी राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले.यासंदर्भात महेश पाटील यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले की, महावितरण ज्या पद्धतीने एखाद्याने बील भरले नाही की दंड लावते, तशीच जाण या ठिकाणीही ठेवावी. मयताच्या कुटुंबीयांना अवघे ५० हजार ही मदत आहे की तोंडाला पाने पुसली. तसेच ज्या अर्थी महावितरणने अर्थसहाय्य केले, त्या दृष्टीने महावितरणने त्यांची चूक मान्य केली आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने अर्थसहाय्य केले. तेवढीच तत्परता दाखवत महावितरणने त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी द्यावी. ती कुठे द्यावी, कोणत्या विभागात, पदावर द्यावी याचा निर्णय शैक्षणिक योग्यतेनूसार घेण्यात यावा, अथवा नियमाने घ्यावा. पण नोकरीची हमी हवीच. महेश पाटील यांनीही तातडीने तिवारीच्या उपचारार्थ १० हजारांचे अर्थसहाय्य केले असल्याचे सांगण्यात आले. मयत तिवारीच्या कुटुंबीयांची परिस्थितीचा आढावा घेतला असता घरातला कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबीयाला भविष्याची चिंता आहे, नोकरी देऊन महावितरणने निदान ती चिंता कमी करावी, आणि त्यांना दिलासा द्यावा असे महेश पाटील म्हणाले.
मयत तिवारीच्या कुटुंबीयांना महावितरणने नोकरी द्यावी, भाजपा नगरसेवक महेश पाटील यांचे उर्जामंत्र्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 5:00 PM