ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्या वेळी पंतप्रधान करण्याबरोबरच लोकसभेच्या जिल्ह्यातील तिन्ही जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीच्या मेळाव्यात रविवारी करण्यात आला. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमोद हिंदुराव यांच्यासह महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी एकमुखाने व एकदिलाने कार्य करण्याचा निर्धार करीत विजयाचा एल्गार यावेळी केला.
ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर हा मेळावा झाला. मेळाव्याला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्ष (आठवले), पीआरपी, बविआ, जेएसएस, आरएसपी, पीजेपी, स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना, ब. रि. एकता मंच, रिपब्लिकन पक्ष (खरात), शिवसंग्राम आदी १५ पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी रामभक्ती ही राष्ट्रभक्ती असल्याचे नमूद करीत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना श्रीराम प्रतिज्ञा दिली. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी मेळाव्याचे नियोजन केले होते.
आघाडीला जागा दाखविण्याची वेळकेंद्रीय राज्यमंत्री पाटील म्हणाले, ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, या महाराष्ट्र गीतातील ओळी आपल्याला लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षात आणायच्या आहेत. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला नसता, तर दहा वर्षे ते मुख्यमंत्री राहिले असते. आता विरोधी आघाडीला जागा दाखविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने कार्य करावे.’
शिवधनुष्य कार्यकर्त्यांनी पेलावेयेत्या एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीचे शिवधनुष्य कार्यकर्त्यांनी पेलावे, असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांत झाली नाही, तेवढी कामे अवघ्या दीड वर्षात झाली. तर ७० वर्षांत न झालेल्या राम मंदिरासह सर्व प्रमुख कामे १० वर्षांत झाली, अशा शब्दांत खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजवटीचे कौतुक केले. शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते नरेश म्हस्के, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रमोद हिंदुराव, माजी आमदार आप्पा शिंदे, नामदेव भगत, भास्कर वाघमारे, प्रमोद टाले, गुलाब दुबे यांचीही भाषणे झाली.