कल्याण - केडीएमसीचे भाजपाचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेले भाजपा नगरसेवक महेश पाटील यांच्या सह अन्य दोघांनी शुक्रवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात शरणागती पत्करली. दरम्यान या तिघांचा ताबा ठाणे खंडणी विरोधी पथकाने घेतला असून त्यांना शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे . १३ डिसेंम्बर ला ठाणे ग्रामीण च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सहा जणांना एका दरोड्याच्या तपासात अटक केली होती या आरोपींकडे केलेल्या तपासात नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी नगरसेवक महेश पाटील यांनी दिल्याची माहिती उघडकीस आली . या प्रकरणी २१ डिसेंबर ला महेश पाटील यांच्या विरोधात ठाणे ग्रामीण च्या गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . हत्येचा कट हा डोंबिवलीत शिजल्याने हा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे . याचा तपास ठाणे खंडणी विरोधी पथका कडून सूरु आहे . दरम्यान आरोपी महेश पाटील यांच्यासह सुजित नलावडे ,विजय बाकाडे यांनी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीनासाठी अर्ज केला होता. मात्र हा अर्ज १२ जानेवारीला झालेल्या सुनावणीत फेटाळून लावण्यात आला .या विरोधात आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने २२जानेवारी पर्यंत शरण जावा असे आदेश दिले होते . त्यानुसार शुक्रवारी तिघे आरोपी कल्याण न्यायालयात हजर झाले . दरम्यान शरणागती पत्करलेल्या तिन्ही आरोपींचा ताबा ठाणे खंडणी विरोधी पथकाने घेतला आहे .
नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी देणाऱ्या महेश पाटील यांच्यासह दोघांची न्यायालयात शरणागती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 4:35 PM