बदलापूर : बदलापूरातील खंडणी आणि अपहरणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या महेश कामत याने पोलिसांपासून बचाव करण्यासाठी आठ दिवसात तब्बल १२ कंपण्यांचे मोबाइल सीम वापरले. प्रत्येक सीमचा वापर केवळ एक ते दोन वेळा केल्यावर तो सीमकार्ड बदलत होता. मात्र अशा परिस्थितीतही पोलिसांनी सीमच्या आधारावरच कामतला हैद्राबाद येथून अटक केली. बदलापूरमधील ज्योती हळदणकर यांच्या कॉलसेंटरमध्ये येऊन पाच लाखाची खंडणी महेश याने मागितली होती. खंडणीची रक्कम न दिल्यास बदनामी करीन अशी धमकीही दिली होती. हळदणकर यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यावर त्यांची आणि त्यांच्या कॉलसेंटरची बदनामी देखील कामत याने केली. या प्रकारानंतर मध्यस्थीसाठी गेलेल्या एका पत्रकाराचे अपहरण करुन त्याला मारहाणही कामतने केली होती. या प्रकरणाची तक्रार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांच्याकडे आल्यावर त्यांनी कामत याच्याविरोधात खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल झाल्यावर महेश हा पोलिसांपासून बचाव करण्यासाठी परराज्यात फिरत होता. १ ते ४ एप्रिल दरम्यान तो मेंगलोर येथे नातेवाईकांडे राहत होता. त्यानंतर ४ एप्रिलला तो अटकपूर्व जामिनासाठी मुंबईत आला. मात्र अवघ्या दोन दिवसातच तो पुन्हा हैद्राबादला मित्राकडे लपून बसला होता. ६ ते १३ एप्रिल या कालावधीत महेश सिकंदराबाद, विजयवाडा आणि पुन्हा हैद्राबाद या ठिकाणी फिरत राहिला. या कालावधीत त्याने आपल्या सहकार्यासोबत बोलण्यासाठी अवघ्या ८ दिवसात १२ सीमकार्ड वापरले. मात्र एक सीामकार्ड त्याच्याकडेच राहिल्याने त्याच्या लोकेशनवरुन पोलिसांनी त्याचा माग घेतला. तसेच त्याने ज्या एटीएममधून पैसे काढले त्या एटीएमचे लोकशनही पोलिसांनी मिळविले. १३ एप्रिलला त्याला सिकंदराबाद आणि हैद्राबाद या दोन शहराच्या मध्यावर असलेल्या मुंडा मार्केट येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, कामत याने कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळला. अर्ज फेटाळल्यावर पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला अटक केली. कामत याला अटक केली असली तरी या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा देखील दोन दिवसात शोध घेण्यात येईल असे आगरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
महेशने ८ दिवसात केला १२ सीमचा वापर
By admin | Published: April 19, 2017 12:25 AM