भिवंडी : महापालिकेच्या पाचही प्रभाग समिती सभापतीपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सोमवारी निवडणूक घेण्यात आली. या पाचही प्रभाग समित्यांच्या सभापतीपदावर महिलांची बिनविराेध निवड झाल्याने महिलाराज प्रस्थापित झाले आहे. चार प्रभाग समित्यांवर काँग्रेस तर एका प्रभाग समितीवर भाजप सभापती निवडून आले आहेत.पीठासीन अधिकारी म्हणून रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक ऑनलाइन पार पाडली. प्रभाग समिती सभापती उमेदवारी अर्ज दाखल करताना फक्त प्रभाग समिती क्रमांक-१ मध्ये दोन अर्ज दाखल झाले होते. आरपीआय एकतावादीचे उमेदवार शरद धुळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रभाग समिती क्रमांक-१ वर काँग्रेसच्या नगरसेविका कशाफ अश्रफ खान, प्रभाग समिती क्रमांक २ मध्ये काँग्रेसच्या नगरसेविका रजिया नासिर खान, प्रभाग समिती क्रमांक-३ मध्ये भाजपच्या नगरसेविका नंदिनी गायकवाड, प्रभाग समिती क्रमांक-४ मध्ये काँग्रेसच्या नगरसेविका नाजिमा अन्सारी, प्रभाग समिती क्रमांक-५ मध्ये काँग्रेस नगरसेविका फराज बहाउद्दीन यांचेच अर्ज दाखल असल्याने पीठासीन अधिकारी चौधरी यांनी सर्व प्रभाग समिती सभापतींची बिनविरोध निवड घाेषित केली. पाचपैकी चार काँग्रेस, तर एका समितीवर भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आले. प्रभाग समिती सभापतीपदावर महिलांचा दबदबा राहिला असून पाचपैकी चार महिला सभापती निवडून आल्या आहेत. सर्व नवनिर्वाचित सभापतींचे पीठासीन अधिकारी चौधरी, आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी गुलाबपुष्प आणि नगरपालिका सभाशास्त्र हे पुस्तक देऊन शुभेच्छा दिल्या.
भिवंडी महापालिका प्रभाग समित्यांवर महिलाराज, पाचही सभापती बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 1:14 AM