ठाणे: मालकीण व मोलकरीण यांच्या नात्यातील बंध अत्रे कट्ट्यावर उलगडताना लक्ष्मी ठाकूर यांनी त्यांच्याकडे कामाला असलेल्या मावशी मला आईच्या स्थानी होत्या, असे नमूद केले. मुलगा चार वर्षांचा होता, तेव्हा त्या कामाला आल्या. तब्बल ३१ वर्षे त्यांनी माझ्याकडे घरकाम केले. ८८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. जेव्हा आमच्या मावशी आजारी पडल्या, तेव्हा मी आणि माझ्या मुलांनी त्यांची सेवा केली. आजही माझी डॉक्टर मुले तिच्या फोटोच्या पाया पडल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. तिची आठवण झाली नाही, असा एकही दिवस जात नाही. आठवणी सांगताना लक्ष्मी यांचा कंठ दाटून आला व अश्रू ओघळले. महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मालकीण-मोलकरीण यांच्यातील गमतीदार किस्से, कठीण प्रसंगात एकमेकींना दिलेली साथ आणि मोलकरीण घरात असल्याने अर्थार्जन करताना झालेली साथ याचे अनेकविध पदर ‘तुझ्या विना...’ या कार्यक्रमात उलगडले. एकमेकींना ३० वर्षांहून अधिक काळ साथ देणाऱ्या मालकीण-मोलकरीण यांच्या तीन जोड्यांना संपदा वागळे यांनी प्रश्न विचारून बोलते केले. एकमेकींविषयी गुण-दुर्गुणाचा तासही यावेळी रंगला होता. आपल्या मोलकरीणबाईबद्दल असलेला विश्वास मालकीणबार्इंनी व्यक्त केला. यावेळी अनेक प्रसंग त्यांनी आपल्या आठवणींनी रसिकांसमोर उभे केले. हृदयात जपून ठेवलेल्या आठवणी जेव्हा उपस्थितांसमोर एकमेकींनी उलगडल्या, तेव्हा त्यांचेही डोळे भरून आले. रजनी परचुरे यांनी आपल्याला घरकामात मदत करणाऱ्या रजनी मळसकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. रजनीने तिच्या प्रेमळ स्वभावाने आमच्या सर्वांचीच मने जिंकली आणि ती आमच्या घरातील एक सदस्यच झाली. घरातील पाच पैसेसुद्धा कुठे जाणार नाही, याची खात्री असते म्हणूनच माझ्या घराची एक चावी मी तिला देऊन जाते. सुलोचना गावकर ही माझ्याकडे कित्येक वर्षे काम करीत आहे. तिने माझ्या घरातील पाचवी पिढी पाहिली आहे. नातवंडांचीही ती काळजी घेते, असे पद्मजा खांबेटे यांनी आपल्या कामवाल्याबार्इंबद्दल सांगितले. पद्मजाबार्इंनी मला जेवण बनवायला शिकवल्याचे सुलोचनाने सांगितले. शीला वागळे यांनी आपल्या कामवाल्याबाई नीला देवलकर यांच्याबद्दल सांगितले की, नीला, ही माझी खास मैत्रीण आहे. प्रत्येक गोष्ट मी तिलाच सांगते आणि तिचा सल्लाही घेते. नीला म्हणाली की, शीला वागळे या माझ्या गुरूच आहेत. माझ्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी त्यांनी मला मदत केली. आता माझी मुले चांगली शिकली असून स्वत:चे फ्लॅट्सही घेतल्याचे सांगताना नीलाला भरून आले.
मोलकरीण...? छे... छे ती तर साक्षात आईच!
By admin | Published: March 04, 2016 1:39 AM