ठाणे : बहुचर्चित बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणातील प्रमुख आरोपी सौरभ साहू याला शनिवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीडीआरप्रकरणी फरार असलेल्या सौरभ साहूला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने १७ जून रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून अटक केली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर केले. यावेळी त्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी आतापर्यंत देशातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित आणि यवतमाळच्या एका पोलीस शिपायासह एकूण १६ आरोपींना अटक केली. त्यापैकी बहुतांश आरोपींच्या जबाबामध्ये सौरभ साहूच्या सहभागाचा उल्लेख आला होता. सक्षम अधिकाऱ्याच्या लेखी अथवा ई-मेलशिवाय मोबाइल कंपनी कोणत्याही मोबाइल नंबरचा सीडीआर कुणालाही देत नाही. या प्रकरणातील आरोपींनी मात्र अनेकांचे सीडीआर सहजरीत्या मिळवले. त्यांनी सीडीआर कसे मिळवले, या प्रश्नाचे उत्तर पोलिसांनी शोधले असता, बहुतांश आरोपींचा काटा सौरभ साहूच्या नावावर येऊन थांबत होता. सौरभची अटक पोलिसांसाठी अतिशय महत्त्वाची होती.
सीडीआर प्रकरणातील मुख्य आरोपीला कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:48 PM