अंबरनाथ : अंबरनाथ नगपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराचा स्लॅबचा मोठा भाग बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळला. रात्रीची वेळ असल्याने कुणालाही इजा न झाल्याने आणि मोठा अनर्थ टळला. अखेर हा स्लॅब धोकादायक झाल्याने मुख्य प्रवेशद्वार बंद करून तो तोडण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.
अंबरनाथ पालिकेची इमारत ही तब्बल ४५ वर्षे जुनी आहे. ती आता धोकादायक बनली असून, तिच्या आत अनेक ठिकाणी प्लॅास्टर कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र, आता बुधवारी मध्यरात्री हा स्लॅब कोसळल्यानंतर गुरुवारी दुपारपासून तो तोडण्याचे काम सुरू केले आहे. तोपर्यंत मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवून नगरपालिकेत येणाऱ्या कर्मचारी आणि नागरिकांना मागच्या दरवाजाने म्हणजे फायर ब्रिगेडच्या पाडलेल्या कार्यालयाकडून प्रवेश दिला जात आहे. अंबरनाथ पालिकेची इमारत जीर्ण झाली असल्याने नवीन प्रशासकीय इमारत उभारली आहे. मात्र, तिथे कार्यालय कधी स्थलांतरित होईल? हे अजूनही ठरलेले नाही.
नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जुन्या इमारतीतूनच काम करावे लागत आहे. त्यातच आता जुनी इमारतदेखील जीर्ण झाल्याने तिचे स्लॅब अनेक ठिकाणी कोसळत आहेत, अशा परिस्थितीत अंबरनाथ नगरपालिकेने धोकादायक स्लॅब पाडून तात्पुरता धोका कमी केला असला तरी कार्यालयाच्या आतमध्ये अनेक ठिकाणी स्लॅबचा भाग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.
---------------------------------------