कल्याण : शिल्पकलेविषयी समाजात कमालीची अनास्था आहे. इंटिरिअर डेकोरेटरने चित्र व शिल्पकलेला महत्त्वाचे स्थान दिल्याखेरीज चित्रकार व शिल्पकार यांना चांगले दिवस येणार नाहीत. मात्र, सध्याची अनास्था दूर करण्यासाठी सर्व कलाकारांची संघटना बांधून त्याकरिता संघटनात्मक प्रयत्न केले पाहिजेत, असे मत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार सदाशिव साठे यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब आॅफ कल्याणतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘रोटरी महाकला कुंभ २०१७’च्या निमित्ताने साठे यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. समीर लिमये यांनी त्यांची मुलाखत घेतली. या वेळी नगरसेविका वीणा जाधव, ऋता कोळवेकर, अशोक प्रधान, सिद्धार्थ साठे आदी मान्यवर उपस्थित होते. साठे म्हणाले की, कल्याणमध्ये या महाकला कुंभाच्या निमित्ताने ७० ते ८० टक्के कलाकार बाहेरून आले आहेत. आपल्या कलेचा खजिना त्यांनी उघडून लोकांसमोर मांडला आहे. कलाकारांनी अशा सोहळ्यांमध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. समाजातील प्रत्येक नागरिकाला चित्र व शिल्पकलेविषयी माहिती असली पाहिजे. शिल्प व चित्रकलेबाबत समाजात आस्था दिसून येत नाही. कलाकारही त्याला तेवढेच जबाबदार आहेत. गेल्या काही वर्षांत या कलेला विद्रूप स्वरूप आल्याचे दिसून येत आहे. योग्य दर्जाची कलाकृती निर्माण होऊन घरोघरी पोहोचली पाहिजे. इंटिरिअर डेकोरेटरने चित्र व शिल्पाला महत्त्वाचे स्थान दिले पाहिजे. तरच चित्रकार, शिल्पकार यांना चांगले दिवस येतील. माणसाला जगण्यात समाधान हवे असते, ते त्याला कलेतून मिळत असते. शिल्पकार आपली कला पणाला लावून काहीतरी निर्माण करीत असतो. जगात सर्वोत्तम कलाकृती निर्माण करू, असे कोणी बोलून दाखवत नाही. पण, प्रत्येक वेळी तसे प्रयत्न केले पाहिजे. सामान्य माणसे चित्र, शिल्पे याबाबत बोलतील, असे चित्र, शिल्प दिसत नाही. कलाकाराला आपल्या कलाकृतीची समीक्षा करता आली पाहिजे. शिल्पकलेचा महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रदीर्घ काळ टिकणारी कला आहे, असेही साठे म्हणाले. (प्रतिनिधी)
इंटिरिअर डेकोरेटरने शिल्पकला टिकवावी
By admin | Published: April 16, 2017 4:24 AM