डोंबिवली : केडीएमटीचा शहरातील महापालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या जुन्या प्रवेशद्वारापाशी असलेला नियंत्रण कक्ष दुरवस्थेच्या गर्तेत सापडला आहे. त्यामुळे हा कक्ष आता शेजारील ग्रंथालयाच्या जागेत हलविण्याचा निर्णय सभापती मनोज चौधरी आणि सदस्यांनी घेतला आहे. मात्र, त्याला महापालिका आयुक्त गोविंद बोडके हिरवा कंदील दाखवणार का? याकडे लक्ष लागले आहे.
केडीएमटीचे सभापती मनोज चौधरी, माजी सभापती व विद्यमान सदस्य संजय पावशे, सदस्य संजय राणे यांनी मंगळवारी डोंबिवलीतील केडीएमटीच्या नियंत्रण कक्षाला भेट दिली. महापालिका विभागीय कार्यालयातील जुन्या प्रवेशद्वारापाशी अत्यंत चिंचोळ्या जागेत असलेल्या नियंत्रण कक्षातील भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे छप्पर कधीही कोसळून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. कर्मचाऱ्यांना बसायला अपुरी जागा, डासांचा होणारा त्रास, अशी एकंदरीतच अवस्था पाहून चौधरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे तत्काळ येथील कक्ष अन्यत्र हलविण्याचा निर्णय सभापतींसह सदस्यांनी घेतला.
पर्यायी जागा म्हणून त्यांनी यावेळी ग्रंथालयाच्या जागेचीही पाहणी केली. या कक्षात याआधी आधारकार्ड केंद्र उघडण्यात आले होते. परंतु, कालांतराने ते बंद झाले. सध्या महापालिकेचा ‘फ’ आणि ‘ग’ असा संयुक्त आपत्कालीन कक्ष या जागेत आहे. परंतु, बºयाचशा जागेचा वापर होत नसल्याने तेथे परिवहन नियंत्रण कक्ष चालू करावा, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे. यासंदर्भात लवकरच मालमत्ता विभागाला पत्र लिहिणार असून, लवकरात लवकर नियंत्रण कक्षासाठी ग्रंथालयातील रिकामी जागा मिळावी, यासाठी आयुक्त गोविंद बोडके यांचीही चौधरी व अन्य सदस्य भेट घेणार आहेत.