मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी वसुंधरा महोत्सवाचा समारोप विविध उपक्रमांनी करण्यात आला.
महानगरपालिके मार्फत, आयुक्त संजय काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन ‘माझी वसुंधरा ४. ०’ अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान वसुंधरा महोत्सव २०२४ आयोजित करण्यात आला होता.
समारोप प्रसंगीआमदार प्रताप सरनाईक, सिने अभिनेत्री प्रिया मराठे, सिने अभिनेता शंतनू मोघे, दिपक चड्डा उपस्थिती होते. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांची शहरवासीयांमध्ये जागृती निर्माण करणे, पर्यावरण व संस्कृती संवर्धनासाठी विविध प्रकारचे आयोजन केले.
सदर प्रदर्शनामध्ये औषधी वनस्पती, बी- बियाणे रोपे, सोलार सेल्स, सोलार बॅटरी, इव्ही चार्जिंग पॉइंट्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादीचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा, होम मिनिस्टर, पैठणीचा खेळ, सायक्लोथॉन आदींचे आयोजन करण्यात आले होते.
आयुक्त काटकर सह अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त कल्पिता पिंपळे, रवि पवार, शहर अभियंता दीपक खांबित, माजी नगरसेविका तारा घरत, स्नेहा पांडे, वंदना पाटील, नीला सोन्स, शुभांगी नाईक, माजी नगरसेवक दौलत गजरे आदींच्या उपस्थितीत पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्याचबरोबर शहरातील विविध गृह निर्माण संस्थांनी कचरा व्यवस्थापनात महापालिकेस विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आयुक्त यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.