ठाणे : देव्हाऱ्यातील दिव्यामुळे आग लागून घरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास येथील कापूरबावडी परिसरात घडली. सुमारे तासाभरानंतर ही आग आटोक्यात आणण्यात ठाणे अग्निशमन दलाला यश आले. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे.
शहरातील घोडबंदर रोड येथील कापूरबावडी परिसरात ‘कुंदन निवास’ हे तळअधिक एक मजली घर आहे. हे घर जेठालाल गोमतीवार यांच्या मालकीचे असून, ते त्यांनी कमलेश गोमतीवार यांना भाडेतत्त्वावर दिले आहे. मंगळवारी सकाळी घरातील देव्हाऱ्यामध्ये दिवा लावून गोमतीवार कुटुंबीय घराबाहेर पडले होते. याचदरम्यान दिव्याने पेट घेतल्याने लाकडी देव्हाऱ्याला आग लागली. ही आग हळूहळू घरभर पसरली. त्यामुळे घरातील कपडे आणि इतर वस्तूंनी पेट घेतला.
आगीची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. यावेळी एक फायर इंजिन आणि एक पाण्याचे टँकर पाचारण करण्यात आले होते. तातडीने या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्यावर साधारण तासाभराने आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी आगीत घराचे आणि घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
-------------