मीरारोड - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना ३ जवानांसह मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्यानं सर्वत्र शोककळा पसरली आहे. मीरारोडचे रहिवासी असलेले कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्यामुळे शहर शोकसागरात बुडालं असताना भाजपाकडून मात्र नगरसेवकाचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी भाजपा नगरसेवकाचा वाढदिवस डिजेच्या दणदणाटात साजरा झाला, तिथपासून शहीद राणे यांचं घर हाकेच्या अंतरावर आहे. भाजपाचे नगरसेवक आणि प्रभाग समितीचे माजी सभापती आनंद मांजरेकर यांचा वाढदिवस साजरा झाला. या समारंभात महापौर डिंपल मेहता, स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह भाजपाचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात भाजपाच्या नेत्यांनी भाषणंदेखील ठोकली. विशेष म्हणजे या सर्वांनी सोशल मीडियावर शहीद राणे यांना आदरांजली वाहणाऱ्या पोस्ट टाकल्या होत्या. मात्र त्याच संध्याकाळी भाजपाच्या सर्व नेत्यांनी वाढदिवसाची पार्टी झोडली.सोमवारी रात्री काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये घुसखोर दहशतवाद्यांशी लढताना चार जवानांना वीरमरण आलं. यात मीरारोडच्या शीतल नगर भागात राहणाऱ्या २९ वर्षांच्या मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांचाही समावेश आहे. मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच परिसरावर शोककळा पसरली. यानंतर राणे कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. महत्वाचे म्हणजे स्वत: आमदार नरेंद्र मेहता व परिसरातील नगरसेवकांनीदेखील कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. मात्र त्यानंतर या मंडळींनी शीतल नगरच्या बाजूच्याच भागात भाजपा नगरसेवक आनंद मांजरेकर यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. शहीद राणे यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जांगिड इस्टेटजवळील सेंट पॉल शाळेसमोर आलिशान मंडप टाकून भाजपा नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी डीजेच्या तालावर जल्लोष केला. यावेळी विविध थंडपेयांसह खाद्यपदार्थाची मोठी मेजवानी ठेवण्यात आली होती. महापौर डिंपल मेहता यांच्यासह उपमहापौर चंद्रकांत वैती तसेच भाजपाचे प्रशांत दळवी, दिपीका अरोरा, हेमा बेलानी, दौलत गजरे, हेतल परमार, अनिता मुखर्जी, विविता नाईक, वंदना भावसार या नगरसेवकांसह निलेश सोनी, काजल सक्सेना, सोनिया नायक, किरण चेऊलकर, सुरेश दुबे आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मांजरेकर यांनी केक कापले. आमदार नरेंद्र मेहता यांचं आगमन होताच शहेंशाह हे गाणं डिजेवर वाजवण्यात आलं. महापौर डिंपल मेहता, आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना केक भरवून वाढदिवसाचा आनंद लुटला. यावेळी महापौर डिंपल व आमदार मेहता यांनी भाषण करत मांजरेकर यांना शुभेच्छा दिल्या. याविषयी मांजरेकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.
मेजर कौस्तुभ राणेंच्या हौतात्म्यानं मीरारोडवर शोककळा; भाजपा नेते मात्र वाढदिवसाच्या पार्टीत दंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 8:01 AM