ठाणे : मुंबई-आग्रा महामार्गावरुन एच.पी. कंपनीचा रिकामा गॅसचा टॅंकर तुर्भे येथे गॅस भरण्यासाठी सोमवारी संध्याकाळी जात असता आटगावजवळ टायर फुटल्यामुळे तो रेल्वे रुळावर आदळला. दरम्यान १५ ते २० मिनीट आधी या रुळावरून उपनगरीय गाडी म्हणजे लोकल गेल्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या दाट काळोखात फायर ब्रिगेडच्या सहाय्याने, क्रेनद्वारे टँकर हटवण्याचं जिकरीचं काम करण्यात आलं. तसेच, कल्याण ते कसारा, इगतपुरी दरम्यान अडकलेल्या प्रवाशांना तत्काळ बससेवा उपलब्ध करून दिली. त्यामुळे, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांचीच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
टायर फुटल्यामुळे गॅस टँकर चालकाचे गाडीवरुन नियंत्रण सुटले व गॅस टँकर मुंबई-आग्रा महामार्गावरुन डिव्हायडर तोडून थेट आटगाव जवळ रेल्वे रुळावर जाऊन धडकला. या दुर्घटनेची माहिती तत्काळ ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांना मिळताच त्यांनी फायर ब्रिगेड यांना सूचना देऊन ताबडतोब रुळावरील टँकर हटविण्याच्या सूचना दिल्या. फायर ब्रिगेडच्या जवानांनी रात्री उशिरा हा दुर्घटनाग्रस्त टँकर यशस्वीपणे बाजूला केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत करता आली, असा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे.
दुर्घटनाग्रस्त टॅकर रेल्वेरुळावर धडकण्याच्या २० मिनिटांआधी एक लोकल या रुळावरून धावली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून तात्काळ उपाय योजना केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला, असा दावा प्रशासन करीत आहे. वाहन रुळावरुन काढले. त्यानंतर, रेल्वे वाहतूक पुन्हा सुरु झाली. ट्रॅफिकचा अवधी जास्त असल्याने एसटी बसेसद्वारे रस्ते वाहतूक होऊ शकली. कल्याण, कसारामधील स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांची व्यवस्था करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आल्याचे प्रवाशांकडून सांगितले जात आहे.