अजित मांडके,ठाणे : खारेगाव ते गायमुख असा १३ किमीचा कोस्टल रोड विकसित केला जात आहे. या मागार्तील कांदळवन क्षेत्र बाधीत होणाºया वन जमिनीच्या बदल्यात चंद्रपुर जिल्ह्यात पर्यायी जमिन दिली जाणार आहे. त्यानंतर आता या जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया देखील सुरु झाली असून येथील जमीनीची मोजणी करण्यासाठी महापालिकेने तीन लाखांचे शुल्क महापालिकेने भरले आहे. त्यानुसार बुधवार पासून चंद्रपुर येथील जमीन मोजणी सुरु होणार असल्याची माहिती महापालिकेच्या सुत्रांनी दिली. त्यामुळे आता लवकरच जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडून कोस्टल रोडच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.
घोडबंदर भागात रस्ता मोठा असला तरी देखील या भागात आजही वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून कोस्टलचा रोडचा विचार सुरु झाला. त्यानंतर मागील काही महिन्यांपासून गायमुख ते खारेगाव कोस्टल रोडला मुर्त स्वरुप प्राप्त होत असल्याचे दिसत होते. हा कोस्टल रोड १३ किमीचा आहे. तसेच तो ४० ते ४५ मीटर रुंद असणार आहे. दरम्यान या मागार्तील अडथळे दूर करण्यासाठी सल्लागाराची नेमणुक करण्यात आली होती.
या सल्लागाराने केलेल्या सर्व्हेक्षणात पर्यावरण विभागाची परवानगी घेणे आवश्यक ठरणार आहे. तसेच वनविभाग व इतर विभागाच्या परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करणे आदी कामे करण्यात येणार आहे. त्यानुसार या कामासाठी आता २६७४ कोटींचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. दुसरीकडे बाळकुम ते गायमुख असा रस्ता करण्याकामी कांदळवन क्षेत्र बाधीत होणाºया वन जमिनीच्या बदल्यात वनोत्तर क्षेत्र वन विभागाला हस्तांतरीत करण्यासाठी जमिन उपलब्ध होण्यासाठी पालिकेने वनविभागाकडे पालघर, गडचिरोली आणि सातारा येथील तीन जागांचा पर्याय दिला होता. मात्र वनीकरणासाठी येथील जागा अनुकुल नसल्याने वनविभागाने या जागांचे प्रस्ताव नाकारले होते. त्यानंतर चंद्रपुर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील जमीनीचा पर्याय पालिकेने पुढे आणला. त्या संदर्भातील प्रस्ताव पालिकेने वनविभागाला दिला होता. त्याला वनविभागाने सहमती दर्शविली. त्यामुळेच पालिकेने आता जागा हस्तांतरण आणि ना हरकत प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला सुरवात केली होती.
त्यानुसार आता ठाणे महापालिकेने चंद्रपुर जिल्ह्यातील सिंदेवाही तहसील कार्यालयाकडे जमीनीच्या मोजणीसाठी तीन लाख ६ हजारांचे शुल्क नुकतेच भरले आहे. आता बुधवार (आज) पासून येथील जमीनीच्या मोजणीला सुरवात होणार असल्याची माहिती पालिकेतील सुत्रांनी दिली. त्यामुळे जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन कोस्टलच्या मार्गातील प्रमुख अडथळा या निमित्ताने दूर होणार आहे.