ठाणे : महाराष्ट्र राज्यातील विविध विमानतळावर व मुंबई स्थित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार (आंतरराष्ट्रीय टर्मिनल- २) व विलेपार्ले सांताक्रूझ येथील देशांतर्गत (डोमेस्टिक टर्मिनल - १) येथे विमानतळाच्या आत तसेच टी- १ व टी - २ या दोन्ही विमानतळावरून जी विविध विमाने आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत उड्डाण करतात व मुबंईत उतरतात त्या सर्व विमानामध्ये उद्घघोषणा मातृभाषा मराठीत करावी अशी मागणी ठाण्यातील बालकलाकार अर्थव वगळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सोमवारी त्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे निवेदन सादर केले. अर्थव याने अनेक मराठी, हिंदी मालिकांमधून काम केले आहे. तसेच सिनेमातही त्याने आपली चुणक दाखविली आहे. तो इयत्ता नववीत शिकत आहे. राज्यात ३ आंतरराष्ट्रीय विमानतळ व ७ देशातर्गत विमानतळ कार्यरत आहेत. तसेच मुंबई विमानतळाहून दररोज सरासरी ९८० विमानसेवा उड्डाणे विविध ठिकाणी होतात. एका सार्वेक्षणानुसार २०२२-२३ मध्ये ४४ दशलक्ष प्रवाश्यांनी मुबई विमानतळाचा उपयोग केला होता.
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात देश विदेशातून पर्यटक येतात. मुंबईस्थित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वाधिक व्यस्त असलेले विमानतळ म्हणून ओळखले जाते. तासाला ४० विमानांची उड्डाणे होतात २४ तासात अंदाजे ९६० विमाने या विमानतळावर उतरतात. मुंबई स्थित छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर रोज त्यामधून सुमारे दीड लाख प्रवासी दिवसाला प्रवास करतात. त्यामुळे आपण ही मागणी करीत असल्याचे त्याने पत्रात नमुद केले आहे.
मराठी ही आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा आहे. तिचा आम्हाला गर्व व अभिमान आहे, महाराष्ट्राची वैभवशाली संस्कृती आहे. आपल्या मातृभाषा मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी मराठी भाषा जागतिक स्तरावर नेण्यासाठी, मराठी भाषेचा वापर व प्रसार सर्वत्रच होण्यासाठी एक पाऊल पुढे म्हणून सर्वच महाराष्ट्रातील विमानतळावर व आत विमानाबद्दल सूचना व माहिती देण्यासाठी इंग्रजी व हिंदी भाषेप्रमाणे उद्घघोषणा 'मातृभाषा मराठीत' करावी व या दोन्ही विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या व उतरणाऱ्या विमानामध्ये इंग्रजी व हिंदी भाषेप्रमाणेच उद्घघोषणा मातृभाषा मराठीत' करावी अशी मागणीही त्याने केली आहे.
विमानात उद्घघोषणा मातृभाषा मराठी भाषेत संवाद रेकॉर्ड करून ते चालवावेत शिवाय विमान तिकिटावर ही इंग्रजी भाषेप्रमाणे मराठीत देवनागरी भाषेत 'बोर्डिंग पास' / विमान तिकीट' प्रिंट करावेत ही विनंती. तसेच विमानतळाबाहेरील बाजूसही विमान उड्डाणांची माहिती दर्शवण्यासाठी विमानतळ प्रवेश द्वारावर एलइडी स्क्रीन लावलेल्या आहेत त्यावर मराठी भाषेत सुद्धा माहिती दर्शवावी अशी मागणही त्याने केली आहे.