ठाणे : कर्ज फेडण्यासाठीच वसईतील एका ठेकेदाराने ठाण्यात आपल्याकडून आठ लाखांची रोकड लुटल्याचा बनाव केल्याचे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने उघड केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त मुकूंद हातोटे यांनी दिली. त्याने दिलेली तक्रार आता रद्द होणार असून त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ठाण्याच्या घोडबंदर रोडवर गायमुखजवळ १७ फेब्रुवारी २०१८ रोजी आपल्याला लुटल्याची तक्र ार वसईतील मजूर ठेकेदार मोहम्मदवली शेख यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांबरोबर गुन्हे अन्वेषण विभागाचे वागळे इस्टेट घटक ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांचे पथकही समांतर तपास करीत होते. याच तपासात शेखने दिलेल्या उलटसुलट उत्तरांमुळे हा बनाव उघड झाल्याचे हातोटे यांनी सांगितले.शेखला नॉर्थ कंस्ट्रक्शनस् कंपनीने मजुरांच्या वेतनाचे सात लाख रुपये दिले होते. त्याच्या स्वत:कडील एक लाख अशी आठ लाखांची रोकड वसईतील बँकेतून काढून १७ फेब्रुवारी रोजी तो मुंबईत गोवंडीला मजुरांना देण्यासाठी जात होता. त्याचवेळी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास दोन वेगवेगळ्या मोटरसायकलवरून आलेल्या चौघांनी आपल्याकडील ही आठ लाखांची रोकड गायमुखजवळ लुटल्याचा दावा त्याने कासारवडवली पोलिसांकडे केला होता. तशी त्याने तक्रारही दाखल केली होती. रनावरे यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केलेल्या चौकशीत त्याचे बिंग फुटले. अखेर आपल्यावर झालेल्या २४ लाखांच्या कर्जांपैकी काही रक्कम यातून फेडता येईल, या कल्पनेतून आठ लाखांच्या लुटीचा बनाव केल्याची कबुलीच त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याच आठ लाखातून काही देणीही त्याने दिल्याचे तपासात उघड झाले. कामगारांच्या पगाराचे पैसे देण्यासाठी नॉर्थ कंस्ट्रक्शनस्च्या मालकाने त्याला ही रक्कम दिली होती.
कर्ज फेडण्यासाठी ठेकेदाराने केला बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:54 AM