ठाणे : कोरोनामुळे उद्भवलेल्या जागतिक महामारीमुळे शैक्षणिकदृष्ट्या होणारी हानी भरून काढण्यासाठी, आपल्याला मिळालेल्या या फावल्या वेळेचा सदुपयोग करणे गरजेचे आहे. या वेळात ॲनिमेशन क्षेत्रात नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने, काही फ्री ॲप्सच्या मदतीने स्वयं-अध्ययनाने, व्हिडोओ मेकींगचा सराव करणे फायद्याचे ठरेल, असे आयआयटी- मुंबई येथे प्रकल्प संशोधन वैज्ञानिक या पदावर कार्यरत असलेले डॉ.योगेंद्र पाल म्हणाले.
दुसऱ्या सत्रात डॉ. योगेंद्र पाल यांनी `फ्री ॲप्स व मोबाईल व्हिडीओ` या माहितीपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी फ्री व्हिडिओ मेकींग करिता महाजालावर उपलब्ध ॲप्स, संकेतस्थळांची सविस्तरपणे माहिती दिली, ज्यामध्ये Powteen, Toonly, Vyond यांचा समावेश होता. या ॲप्सच्या साहाय्याने बनविलेले व्हिडिओ त्यांनी उदाहरणादाखल दाखवले. Freepik या मोफत छायाचित्रे पुरविणाऱ्या संकेतस्थळाची ओळख करून दिली. तसेच मोफत ॲनिमेटेड व्हिडिओ बनवण्यासाठी Pencil2d, Blender या उपयुक्त संकेतस्थळांची नमुना व्हिडिओंच्या माध्यमातून सविस्तर माहिती डॉ.पाल यांनी दिली. ॲनिमेशन तसेच एडिटींग क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर उल्लेखलेल्या सर्व संकेतस्थळांचा, ॲप्सचा उपयोग करावा, या ॲप्सच्या साहाय्याने व्हिडिओ बनवण्याचा सराव करावा. तसेच बहुतांश खाजगी क्षेत्रात जावा स्क्रीप्टचा वापर होत असल्याने जावा स्क्रीप्टचे ज्ञान अवगत करावे, असा सल्ला डॉ.पाल यांनी दिला.
सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे आणि मुंबई विद्यापिठाच्या वाणिज्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर 'ई-लर्निंग : ब्लॅकबोर्ड टू ब्रॉडब्रँड.' ह्या वेबिनारच्या चौथ्या दिवशी `एम.एस-एक्सेल` आणि `फ्री ॲप्स व मोबाईल व्हिडीओ मेकींग` ` यांसारख्या विषयांवरील अभ्यासपूर्ण व्याख्यानांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला. के. सी. महाविद्यालयातील प्रा.डॉ. सखाराम मुळ्ये यांनी `एम.एस-एक्सेल' मधील `Formulas` हा गणिती क्रियांशी निगडित घटक उदाहरणांच्या साहाय्याने सविस्तरपणे समजावून सांगितला. याशिवाय `Insert menu`, `Charts`, `Pivot table`, `Filter`, `Wrap text, Smart art, save menu, undo & redo command इ. महत्त्वाचे घटक प्रात्याक्षिकांच्या साहाय्याने समजावून सांगितले.
अशारितीने चौथ्या दिवसाची दोन्ही सत्रे माहितीपूर्ण व्याख्यानांनी रंगली. दोन्ही सत्रात वक्त्यांनी विद्यार्थ्यांना उदभवणाऱ्या शंका ऐकून त्यांचे शंकानिरसनही केले. आजच्या कार्यक्रमाची सूत्रे पूर्णपणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांभाळली. या उपक्रमाची सांगता ६ जुलै रोजी होणार आहे. अजूनही ईच्छूक विद्यार्थ्यांना https://forms.gle/4my6C7naMaE3YXyDA या लिंकवर विनामूल्य नावनोंदणी करता येणार आहे.