डोंबिवली : पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ सोमवारी पुकारलेल्या बंदमध्ये शहरातील १०० हून अधिक डॉक्टरांनी सहभाग घेतला. केंद्र सरकारने हे हल्ले तत्काळ रोखावेत, अन्यथा यापुढे अशा घटना घडल्यास पूर्णत: काम बंद आंदोलन केले जाईल. त्यात जर एखाद्या रुग्णाच्या जीवनमरणाचा प्रश्न उद्भवल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, याची नोंद सत्ताधाऱ्यांनी घ्यावी, असा इशारा संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. मंगेश पाटे यांनी केले. देशभरातील आंदोलनासंदर्भात माहिती देण्यासाठी आयएमएने सोमवारी डोंबिवली जीमखाना येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पाटे यांनी पश्चिम बंगालमधील घटनांची चित्रफीत दाखवत निषेध व्यक्त केला.डॉक्टर हादेखील माणूस आहे. कोणीही आमच्या जीवावर उठू नये. अन्यथा आम्हालाही पूर्णत: कामबंद आंदोलन करावे लागेल. डॉक्टर हा सामाजिक बांधिलकी जपून काम करतो. त्याला रुग्ण सेवा करताना मिळणारा आनंद मिळू द्या. क्षुल्लक कारणावरून त्याच्या जीवावर हल्ला करू नका. पण तरीही विविध राज्यांमध्ये डॉक्टरांवरील हल्ले कमी होत नाहीत, ही शोकांतिका आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे केंद्र सरकारने डॉक्टरांच्या संरक्षणासाठी कायदा बनवावा अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात या आधीच्या केंद्र सरकारला माहिती दिली आहे. मात्र, हा कायदा अजूनही झालेला नाही. हे काही प्रमाणात देशभरातील खासदारांचेही अपयश आहे. आता पुन्हा केंद्रात मोदी सरकार आले आहे. त्यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे. निदान या पाच वर्षांत तरी तसा कायदा तयार करावा. तो मंजूर करण्यासाठी विधेयक मंजूर करावे लागेल. त्यासाठी संस्थेने देशभरातील सर्व खासदारांना पुन्हा नव्याने निवदेन दिले आहे. पावसाळी अधिवेशनात हा विषय डॉक्टरांसाठी खासदारांनी मांडावा, आणि डॉक्टरांना लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी डॉ. अर्चना पाटे, मीना पृथ्वी, डॉ. वंदना धाकतोडे, डॉ. भक्ती लोटे, डॉ. विजयालक्ष्मी तसेच विविध डॉक्टर उपस्थित होते.डॉक्टरांच्या बंदला आयुर्वेदिक सेवा देणाºया वैद्यांनीही पाठिंबा दिला. त्यांनीही दिवसभर काळ्या फिती बांधून येणाºया प्रत्येक रुग्णाला डॉक्टरांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, या संदर्भात माहिती दिल्याचे वैद्य विनय वेलणकर यांनी सांगितले.कल्याणमध्ये आयएमए, आयुर्वेद व्यासपीठाकडून निषेधकल्याण : डॉक्टरांच्या बंदला कल्याणमधील ५०० डॉक्टरांनी पाठिंबा दर्शवला. तर, आयुर्वेद व्यासपीठ, कल्याणच्या डॉक्टरांनी काळ्या फिती लावून हल्ल्याचा निधेष केला. दरम्यान, बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळल्याने रुग्णांची फारशी गैरसोय झाली नाही. कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या अमानुष मारहाणीचे पडसाद देशभरात उमटले आहेत. कल्याणमधील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या संघटनेने या बंदला पाठिंबा दिला. संघटनच्या सर्व सदस्यांनी काळ्या फिती लावून कल्याण-मुरबाड रोड परिसरात डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध नोंदवला. सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, मागणी संघटनेचे सचिव डॉ. प्रशांत पाटील यांनी केली. आयुर्वेद व्यासपीठाच्या कल्याण शाखेच्या शंभर सदस्यांनीही निषेध नोंदवला. तसेच काळ्या फिती लावून काम केले, अशी माहिती डॉ. अभिजीत ठाकूर यांनी दिली.
'डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा बनवा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:17 AM