ठाणे/मुंब्रा : गुजरातमध्ये माजलेला अनाचार संपवण्यासाठी मी, जिग्नेश आणि हार्दिकने झंझावात निर्माण केला होता. त्यामुळेच भाजपची गुजरातमध्ये पिछेहाट झाली आहे. आता महाराष्ट्राला भाजपामुक्त करू, असा निर्धार गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार अल्पेश ठाकोर यांनी सोमवारी दिला.मुंब्रा येथील मित्तल ग्राउंडवर आयोजित केलेल्या देशातील सर्वात मोठ्या मुशायराला अल्पेश ठाकोर यांनी भेट दिली. या प्रसंगी आ. जितेंद्र आव्हाड, ज्येष्ठ नगरसेवक शानू पठाण, कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शमीम खान, राजन किणे आदी उपस्थित होते.ठाकोर पुढे म्हणाले की, या देशात कधी नव्हे एवढी अराजकता माजली आहे. दलित, अल्पसंख्याक दहशतीखाली जगत आहेत. भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली होत आहे. ठराविक वर्गाच्या हितासाठी बहुसंख्य जनतेला वेठीस धरले जात आहे. हा प्रकार संविधानाकरिता धोकादायक आहे. शिवाय, राक्षसी बहुमताच्या जोरावर जनविरोधी धोरणांचा अवलंब केला जात आहे. यामुळेच संसदीय लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यासाठीच मी, जिग्नेश मेवाणी आणि हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये भाजपाला आव्हान दिले होते. यामुळेच बालेकिल्ल्यातच भाजपाची पीछेहाट झाली आहे.>या देशातील भ्रष्टाचाराच्याविरोधात गळे काढून आणि थापेबाजी करून सत्ता मिळवलेला भाजपाच आता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात हे प्रथमच होत आहे. आपले पंतप्रधान लाखो रुपयांचे मशरूम खात आहेत. मात्र, देशातील कोट्यवधी जनतेला आपली अर्धी भूकही भागवता येत नाही. खोटं बोलून जनतेची फसवणूक करण्याची हातोटी या सरकारला गवसली असल्याची टीका त्यांनी केली.
महाराष्ट्र भाजपामुक्त करू - अल्पेश ठाकोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 5:31 AM