बदलापूर : पर्यावरणपूरक मूर्तीची निर्मिती व्हावी, यासाठी शहरातील सर्व मूर्तीनिर्मिती करणाऱ्या कारागिरांना एकत्रित करून त्यांना शाडू आणि कागदाच्या लगद्यापासून मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. १८ जानेवारीला या प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप होणार आहे. या कार्यशाळेत ५९ व्यावसायिक मूर्तिकारांनी सहभाग घेतला आहे. पर्यावरणाची हानी टाळता यावी आणि इको-फ्रेण्डली मूर्तीनिर्मिती करण्याचा ओघ वाढावा, यासाठी केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत बदलापुरात ४ ते १८ जानेवारी या कार्यकाळात या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. गणेशोत्सवाआधी अनेक हौशी नागरिक पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवून त्यांची स्थापना करतात. शाडूच्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण शहरातील सर्व मूर्तिकारांना दिल्यास जास्तीतजास्त नागरिक त्याचा लाभ घेतील. तसेच कागदाच्या लगद्यापासूनही सुबक मूर्ती तयार करणे शक्य असल्याने त्याचेदेखील प्रशिक्षण देण्यात येत आहे. केंद्र सरकारमार्फत अविनाश पाटकर आणि विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. बदलापुरातील मूर्तिकार रवी काळे यांच्या कारखान्यात ते घेण्यात येत आहे. या कार्यशाळेत गणेशमूर्तींव्यतिरिक्त शोभेच्या मूर्ती, भिंतीवर लावण्यासाठी शिल्प आदींचीही निर्मिती करण्यात येत आहे. (प्रतिनिधी )
कागदाच्या लगद्यापासून मूर्ती बनवा
By admin | Published: January 18, 2016 1:56 AM