बदलापूर : ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात येत असतानाच कल्याण जिल्हाही स्वतंत्र करावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यासाठी कोकण आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समितीही स्थापन करण्यात आली होती. मात्र हा प्रस्ताव अद्यापही निर्णयाच्या पटलावर आला नव्हता. या कल्याण जिल्ह्याच्या प्रस्तावाबाबत नव्याने मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. वाढते नागरीकरण पाहता कल्याण जिल्हा आणि स्वतंत्र आयुक्तालयाबाबतची मागणी करण्यात आली आहे.
पालघरपाठोपाठ कल्याण जिल्हा व्हावा अशी मागणी ठाणे जिल्ह्यातील काही आमदारांनी राज्यपालांकडे केली होती. मात्र या मागणीवर अद्याप कोणताच विचार झालेला नाही. मात्र कल्याण आणि परिसराचा वाढता विस्तार पाहता नव्याने ही मागणी पुढे केली जात आहे. आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कल्याण जिल्ह्याबाबतची नव्याने मागणी केली आहे. या आधीही सरकारी स्तरावर अशी मागणी करण्यात आली होती. त्या मागणीनुसार समिती तयार करून त्या समितीचा अहवाल तयार करण्यात आला आहे.या समितीचा अहवाल कल्याण जिल्हा निर्मितीला पूरक आहे. मात्र त्या समितीच्या अहवालावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आमदार कथोरे यांनी या समितीच्या अहवालानुसार कल्याण जिल्ह्याच्या निर्मितीचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
ठाणे जिल्ह्याचे पुन्हा एकदा विभाजन करून स्वतंत्र कल्याण जिल्ह्याची निर्मिती करावी लागणार आहे. तसे करताना रायगड जिल्ह्याचीही पुनर्रचना करून कर्जत तालुक्याचा समावेश कल्याण तालुक्यात करावा अशी मागणी आहे. ऐन निवडणुकीच्या आधी स्वतंत्र कल्याण जिल्ह्याची मागणी झाल्याने हा विषय निवडणुकीचा मुद्दा म्हणून पुढे येणार आहे, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे.कल्याण पोलीस आयुक्तालय हवेकल्याण जिल्ह्याप्रमाणेच आता या परिसरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता कल्याणसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करण्याची गरज आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शहाड, आंबिवली, टिटवाळा आदी शहरे इतक्या झपाटयाने वाढत आहेत. त्यासाठी सध्या अस्तित्त्वात असलेली पोलीस ठाणी आणि पोलीस कर्मचारी अपुरे पडत आहेत. ठाणे शहर पोलीस
आयुक्तालयाकडून तडीपार झालेले अनेक गुन्हेगार हे पोलीस हद्दीचा फायदा घेत बदलापूरच्याजवळ वांगणी आणि अन्य तत्सम ग्रामीण पोलीस हद्दीत वास्तव्यास आलेले आहेत. त्यामुळे या गुन्हेगारांनी आपले हातपाय या परिसरात रोवायला सुरूवात केली आहे. त्यांचा बंदोबस्त करायचा असेल, तर कल्याण पोलीस आयुक्तालय करून त्याची हद्द वांगणी परिसरातील ग्रामीण भागापर्यंत वाढविणे आवश्यक आहे. त्या अनुषंगानेही मागणी करण्यात आली आहे.