लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : येत्या वर्षभरावर आलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत सत्तेत असलेल्या शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपने गटनेता म्हणून मनोहर डुंबरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. परंतु, डुंबरे यांच्या नावाला आता पक्षातून विरोध झाला आहे. त्यांच्या नावाची घोषणा करतांना आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला असून त्यांच्या निवडीच्या पत्रावर देखील स्वाक्षऱ्या केल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत योग्य निर्णय झाला नाही तर आम्हाला दुसरा पर्याय शोधावा लागेल, असा इशाराही या बंडोबांनी दिला आहे. एकूणच भाजपमध्ये आता निष्ठावान विरुद्ध बाहेरून आलेल्यांमध्ये संघर्ष पेटून उठला असून भविष्यात त्याचा फटका पक्षाला सहन करावा लागणार आहे.
आगामी वर्षभरावर महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यानुसार शिवसेनेला टक्कर देणाऱ्या गटनेत्याचा शोध भाजप घेत होती. यासाठी अनेकांची नावे पुढे होती. परंतु, वरिष्ठांनी मनोहर डुंबरे यांची गटनेतेपदी निवड केली. परंतु, आता या निवडीवरून भाजपमध्ये उभी फूट पडली आहे. डुंबरे हे टक्कर देणारे नगरसेवक नसून त्यांच्यापेक्षा पक्षात इतर तगडे नगरसेवक होते, जे शिवसेनेला सळो की पळो करून सोडण्यासाठी सज्ज होते. त्यातही ते महापौर नरेश म्हस्के यांच्या जवळचे असल्यानेच त्यांची निवड केल्याचा आरोपही या नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळेच त्यांनी डुंबरे यांच्या नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी केली नसल्याची माहिती समोर आली आहे.
....