मीरारोड -
एकीकडे स्वच्छतेच्या मोहिमा चालवल्या जात असताना भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस रेल्वे पुला खालच्या कोपऱ्यांचा वापर चक्क मुताऱ्या म्हणून केला जात असल्याने सर्वसामान्य हजारो महिला व पुरुष प्रवाश्याना दुर्गंधी सहन करत मूत्रातून मार्ग काढावा लागत आहे .
भाईंदर रेल्वे स्थानकात ये - जा करण्यासाठी मध्यभागी रेल्वेचा मोठा जिना आहे . तर बालाजी नगर येथून आणखी एक नवीन रेल्वे पादचारी पुल बांधण्यात आला आहे . ह्या दोन्ही पुलांचे जिने अरुंद चिंचोळ्या गल्लीत उतरतात . त्याच चिंचोळ्या गल्लीतून रोजचे हजारो प्रवासी ये जा करतात . परंतु मध्यभागी असलेल्या पुलाच्या लगत तसेच नवीन बांधलेल्या पुलाच्या जिन्या खालील कोपऱ्यात दिवस रात्र अनेक निर्लज्ज प्रवासी हे उघडणपणे लघवी करत असतात . ठिकठिकाणी लघवी केली जात असल्याने त्याची दुर्गंधी ह्या संपूर्ण परिसरात पसरते . दुर्गंधी सहन करत वा नाकावर रुमाल बांधत महिला व पुरुष प्रवाश्याना रोजची ये - जा करावी लागते .
बेकायदा मुताऱ्यांची दुर्गंधी तर सहन करावी लागतेच पण लघवीचा प्रवाह येण्या जाण्याच्या अरुंद गल्लीत पसरत असल्याने मूत्रातून कसाबसा मार्ग महिला व पुरुष प्रवाश्याना काढावा लागतो . रात्रीच्या वेळी तर गल्लीत सर्वत्र मूत्र पसरलेले असल्याने महिलांना घाणीतून चालणे उबग आणणारे ठरत आहे .
या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही . तर जिन्या खालील कोपरे सुद्धा मोकळे असल्याने रात्रीच्या काळोखात तर सर्रास लघवी करणाऱ्या पासून मद्यपान आदी प्रकार सुद्धा चालतात . मध्यंतरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने प्रवाश्याना ये - जा करणे त्रासाचे ठरत होते . दुचाकी आता बंद झाल्या असल्या तरी बेकायदा मुताऱ्यांचा जाच त्रासदायक ठरत आहे .
रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे सुरक्षा बल सह रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्या कडून ह्या बेकायदा मुताऱ्यांच्या गलिच्छ व जाचक प्रकारा कडे दुर्लक्ष केले जात असल्या बद्दल प्रवाश्यां कडून नाराजी व्यक्त होत आहे . तर संबंधित बेजबाबदार रेल्वे अधिकाऱ्यांसह लघवी करणाऱ्या लोकांवर कारवाई करा व परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी उपविभाग प्रमुख रविन्द्र भोसले यांनी केली आहे .