- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बडे मॉल, मल्टीप्लेक्समध्ये बाहेरून पाणी व खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी करणारा कुठलाही कायदा केलेला नसतानाही ठाणेकरांची अडवणूक केली जाते. त्याचप्रमाणे विक्रीदरापेक्षा अवाजवी दर आकारण्यात येतात. याबद्दल आता टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याची संधी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी उपलब्ध करून दिली आहे.ठाणे, डोंबिवली, कल्याण येथील मॉल व मल्टीप्लेक्समध्ये कुटुंबासमवेत जाणाऱ्या लोकांना सोबत पाण्याची बाटली नेण्यास किंवा खाद्यपदार्थ नेण्यास अटकाव केला जातो. तेथील सुरक्षाव्यवस्था पाण्याच्या बाटल्या व खाद्यपदार्थ प्रवेशद्वारावर काढून घेतात. बाहेरील पाणी अथवा खाद्यपदार्थ घेऊन मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट पाहायला जाऊ नये, असा कायदा नसताना केवळ मल्टीप्लेक्समधील ४० रुपयांची पाण्याची बाटली, १०० ते १२५ रुपयांचे पॉपकॉर्न, प्रतिनग ५० ते ७५ रुपये समोसा असे महागडे पदार्थ ग्राहकांच्या गळ्यात बांधण्यासाठी मुजोर मॉल व मल्टीप्लेक्समालकांनी बाहेरील पदार्थांवरील बंदीची मनमानी केली आहे. पाण्याच्या बाटल्या, शीतपेये यावर छापील किंमत असतानाही मॉल व मल्टीप्लेक्समध्ये शीतपेये ८० ते ८५ रुपयांच्या दराने विकली जातात. ही लुटालुट थांबवण्याकरिताच जिल्हाधिकाऱ्यांनी टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. ठाण्यातील अनेक हॉटेलमध्ये स्वच्छतेचे निकष पाळले जात नाहीत. पदार्थांमध्ये भेसळ जाणवते. बाहेरील खाद्यपदार्थास मनाई करणाऱ्यांसह हॉटेल्स किंवा इतर ठिकाणच्या खाद्यपदार्थांच्या दर्जाविषयी, भेसळीबाबत ग्राहकांना आता १८००२२२३६५ या टोल फ्री क्र मांकावर तक्रार करता येणार आहे. खते व बियाणांसंदर्भात शेतकऱ्यांनादेखील १८००२३३४००० या क्र मांकावर तक्रार करता येणार असल्याचे ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत स्पष्ट केले.जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राहक संरक्षणविषयक आढावा घेण्यात आला. त्या वेळी देशपांडे यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. लवकरच राज्याचे ग्राहक धोरण जाहीर होणार असून संबंधित समितीच्या बैठका अंतिम टप्प्यात असल्याचेही देशपांडे म्हणाले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, आदी उपस्थित होते.- ग्राहकाने अस्वच्छता, भेसळ करणाऱ्या हॉटेलांबाबत आता टोल फ्री क्रमांकावर तक्रार करणे शक्य आहे. खाद्यपदार्थांच्या दर्जाविषयी, भेसळीबाबत ग्राहकांना आता १८००२२२३६५ या क्र मांकावर तक्रार करता येणार आहे. खते व बियाणांसंदर्भात तक्रारींसाठी शेतकऱ्यांना हा १८००२३३४००० या क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.बाहेरील खाद्यपदार्थासह पाणी आणण्यास मनाई करणारा कायदा किंवा नियम नाही. यामुळे कुठल्याही मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृह आदी ठिकाणी बाहेरून खाद्यपदार्थ आणि पाणी आणण्यास बंदी घालत असतील, तर तत्काळ जिल्ह्यातील ग्राहक संरक्षण कार्यालयाकडे तक्रार करा.- अरुण देशपांडे, अध्यक्ष, ग्राहक कल्याण सल्लागार समितीछापील विक्र ीदरापेक्षा जास्त किंमत किंवा अवाजवी दर, चुकीचे वजन यासाठी जिल्ह्यातील वैधमापनशास्त्र कार्यालयात २४ तास हेल्पलाइन सुरू ठेवण्यात येणार आहे. या उपक्र माकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांनी त्यांच्या फसवणुकीविरुद्ध तक्रार करावी.-डॉ. महेंद्र कल्याणकर,जिल्हाधिकारी, ठाणे