मोखाडा : आदिवासी भागातील कुपोषण आणि अन्य महत्वाच्या प्रश्नांबाबत राज्यपालांसमवेत पुढील आठवड्यात एक मिटिंग होणार असून संघटनेच्या संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे श्रमजीवींचे संस्थापक विवेक पंडित यांनी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर सांगितले. श्रमजीवी संघटनेने बुधवारी मंत्री पंकजा मुंडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे कुपोषण आणि दारिद्र्य कमी करण्यासाठी तात्काळ रोजगार देणे, शेतीचा व पाणलोट क्षेत्राचा विकास करणे, अमृत आहार योजना बंद करून कुपोषण निर्मुलनासाठी नवीन सर्वंकष योजना तयार करणे, तसेच कुपोषित मुलांच्या कुटुंबात केवळ मुलेच कुपोषित नाहीत तर त्यांचे संपूर्ण कुटुंब हे कुपोषित असल्याने कुपोषणग्रस्त भागातील सर्व आदिवासीना अंत्योदयाची रेशिनंग कार्डे देणे, रेशनवर साखर - तेल आणि डाळी देणे, तसेच केवळ कुपोषित बालकांनाच नाही तर सर्व मुलांना अंडी आणि केळी देणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.जव्हार आणि मोखाड्यासह आदिवासी भागातील ग्रामीण रुग्णालयात स्त्री-रोग व बाल-रोग तज्ञ्जांची नेमणूक करणे, जिल्ह्यातील सर्व रिक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे तात्काळ भरणे या मागण्यांसह रोजगार हमीचे प्रभावी काम करण्यासाठी आजचे उपलब्ध कॉम्प्युटर हे बाबा आदमच्या काळातील असल्याने प्रत्येक तालुक्याला पंचायत समिती आणि तहसील आॅफिस कार्यालयांकरिता प्रत्येकी ४-४ कॉम्प्युटर द्यावेत, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला एक एमबीबीएस आणि दोन बीएएमएस डॉक्टर्स देण्यात यावेत, जव्हारच्या अप्परजिल्हाधिकारी कार्यालयातून आधीप्रमाणेच जिल्ह्याच्या रोजगार हमी विभागाचा आणि अन्न पुरवठा विभागाचा कारभार व्हावा, मांडवी, अंबाडी आणि बोईसर ग्रामीण रुग्णालये ताबड्तोनीने सुसज्जपणे सुरु करावीत. रोजगार हमीचे रिक्त असलेले उपजिल्हाधिकारीचे आणि जव्हारचे प्रांत अधिकारींचे पद तात्काळ भरण्यात यावे या मागण्या केल्या. जव्हारचे कॉटेज हॉस्पिटल २०० बेडेड करण्याचा २०१२ साली झालेला निर्णय तात्काळ अंमलात आणावा. कासा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात यावे. ठक्कर बाप्पा योजनेतून जलसंधारणाची कामे करण्यात यावीत. जिल्ह्यातील प्रत्येक कातकरी कुटुंबाला दोन वर्षांमध्ये पक्की घरे देण्यात यावीत. इत्यादी मागण्या करण्यात आल्या. (वार्ताहर)
कुपोषण : येत्या आठवडयात राज्यपालांकडे होणार बैठक
By admin | Published: September 23, 2016 2:42 AM