लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : एकीकडे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुपोषणाने कोरोनाकाळात ९९ मुले त्यामुळे दगावली आहेत. असे असतानाच शहरी भागात अतिपोषण ही समस्या डोकेवर काढत आहे. कोरोनामुळे मुलांना घराबाहेर जाता येत नाही. टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅबच्यासमोर मुलांचा अधिकतर वेळ जातो. त्यातच एकाच जागी असल्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल कमी झाली आहे. बसल्या जागी खायला मिळत असल्यामुळे लहान मुलांमधील स्थूलता हा चिंतेचा विषय बनला आहे.
जाणकारांच्या मते शहरी भागात कोरोनाच्या लॉकडाऊनपासून ते आता निर्बंध शिथिल होण्यापर्यंत मुलांमध्ये अतिस्थूलतेचे प्रमाण हे सुमारे ४ टक्क्यांनी वाढले आहे. मार्च २०१९ पूर्वी ज्या मुलांचे वजन सुमारे २५ किलो होते त्या मुलांमध्ये आता ७ ते १० किलो वजन वाढले असून ती आता ३२ ते ३५ किलो वजनाची झाली आहेत. वजन वाढणे हे कधीही घातक असून शरीराची त्यामुळे हानी होते, त्यासाठी तातडीने जंकफूड बंद करणे गरजेचे असून, आहाराच्या वेळा ठरवून घ्यायला हव्यात. अन्यथा लहान मुलांमध्येदेखील बीपी, शुगरसह अन्य आजार आढळून येतील, अशी गंभीर स्थिती आहे. हे वेळीच थांबवायचे असेल तर पालकांनी सतर्क व्हायला हवे, जे मागेल ते मुलांना खायला न देता, जे त्याना गरजेचे आहे ते देणे जास्त आवश्यक आहे. मुलांच्या स्थूलपणाला पालकदेखील काहीअंशी जबाबदार असल्याचे जाणकार सांगतात. पूर्वी कधीतरी बाहेरून खाद्यपदार्थ आणले जायचे आता मात्र सर्रास ते आणले जातात, त्याचे अपाय समोर येत असून ते चांगले नसल्याचे सांगण्यात आले.
-----------------------
जिल्ह्यातील कुपोषित बालके
कुपोषित - १४३४
कुपोषित असल्याने दगावली - ९९
--------------------
शहरांत स्थूलता ही नवी समस्या
अति खाणे, आवश्यकता नसताना खाणे, अवेळी खाणे या सोबतच शारीरिक हालचाल न करणे, जंकफूड जास्त प्रमाणात खाणे यामुळे स्थूलता वाढत आहे. खाण्याच्या वेळांमध्ये अंतर न ठेवणे, सकस आहार न घेणे आणि स्वच्छता, व्यायाम यासाठी आळस करण्यामुळे शहरी भागात स्थूलता दिसून येत आहे. सतत मोबाइल, संगणक, टॅब यामुळे शरीराची हालचाल नाही. त्यात बसल्या जागी नाश्ता, जेवण मिळते. त्यासाठीही विशेष प्रयत्न केले जात नाहीत. यामुळे वजन वाढते, असे दिसून आले आहे.
-----------------;--
मसालेदार खाणे, पिझ्झा, बर्गर, मांसाहार खाणे. दोन वेळच्या खाण्यात वेळेचे अंतर न ठेवणे. गरज नसताना खाणे. जेवताना टीव्ही, गेम खळेणे. कोणतेही शारीरिक कष्ट पडणारे खेळ न खेळणे यांसह सतत मोबाइल, संगणक, टॅब यामुळे एका जागी बसून काम करत रहाणे. या सर्व सवयींमुळे स्थूलता वाढत आहे. त्यासाठी पालकांनी सतर्क राहून मुलांना शारीरिक हालचाल करायला लावणे गरजेचे आहे. घरगुती व्यायाम करवून घ्यायला हवा. आठवड्यातून अपवाद वगळता बाहेरचे अन्नपदार्थ देऊ नयेत. सकस आहार द्यावा. बिट, गाजर, हिरव्या भाज्या, मुळा, कोशिंबीर आवर्जून खायला द्या. प्रथिन, कार्बेहायड्रेटसाठी मोड आलेली कडधान्ये पण द्यावीत. -
डॉ. कपिल मगरे, मुलांची वाढती स्थूलता विषयावरील तज्ज्ञ अभ्यासक.
-------------
पालकांचीही चिंता वाढली
लवकरात लवकर मुलांच्या शाळा सुरू व्हायला हव्यात. जेणेकरून त्यांची शारीरिक हालचाल वाढेल. बौद्धिक विकास होईल, एकाच ठिकाणी बसून शरीरावर होणारे अपाय कमी होतील. सतत मोबाइल, संगणक बघून डोळ्यांचे विकार होत आहेत, तसेच शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत. डोकं दुखणे, डोळे दुखणे, शरीर अवजड होणे असे प्रकार सर्रास दिसून येत आहेत. पालकांनी मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष द्यायला हवे.
- सुप्रिया कुलकर्णी, जागरूक पालक