- सुरेश लोखंडे
ठाणे : जंगलातील नदी, नाल्यांमध्ये शिल्लक राहिलेले पाणी या रखरखत्या उन्हात आता आटले आहे. डबके कोरडे पडले आहेत. त्यामुळे व्याकूळ पशूपक्षी, माकडं पाण्याच्या शोधात जंगलात भटकंती करीत आहेत. कल्याण - नगर महामार्गावरील माळशेज घाटात उद्भवलेल्या या परिस्थितीत माकडांसह पशूपक्षी व पावसाळ्यात लावलेल्या औषधी रोपट्यांना सध्या टँँकरद्वारे वन विभाग पाणी पुरवठा करीत आहे. त्यामुळे जंगलातील पशूपक्षांची तहान भागवली जात असल्याचे वास्तव माळशेज घाटात पहायला मिळत आहे.
सह्याद्री पर्वताच्या रांगेतील या माळशेज घाटातील नदी, नाले, ओव्हर कोलडे पडले आहेत. त्यामुळे या घाटातील माकडांसह पशूपक्षांसाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यांच्या खाण्यासाठी फळे, भाजीपाला ही माळशेज घाटात वन विभागाने उपलब्ध केला आहे. त्यामुळे या कडक उन्हात त्यांची उपासमार टाळण्यासाठी मदत होत असून पिण्यासाठी पाणी जंगलात ठिकठिकाणी व महामार्गावर बहुतांशी ठिकाणी उपलब्ध करुन दिले, असे या माळशेज घाट जंगलाचे वन परिक्षेत्र अधिकारी सुधीर मांजरे यांनी सांगितले. प्लास्टिक च्या ड्रम चे दोन भाग करुन त्यात पाणी भरुन ठेवले जात आहे. त्यातील पाणी पशूपक्षी व माकडं पित असल्याचे ही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
या महामार्गावर वाहतूक सध्या बंद आहे. याशिवाय पर्यटकांना ही या घाटात बंदी केली आहे. यामुळे येथील माकडांची उपासमार वाढली आहे. जंगलातील, जांभळे, करवंदे अजून आले नाही, आंब्याची झाडे फारशी नाही. यामुळे ही त्यांची उपासमार वाढली आहे. त्यांची ही उपासमार टाळण्यासाठी मार्केटमधील पडून असलेले फळे, भाजीपाला ही वन विभाग माळशेज घाटात आणून टाकत आहेत. या पशूपक्षांसाठी आणलेले पाणी उन्हामुळे सुकत असलेल्या झाडांना, लागवड केलेल्या औषधी रोपट्यांना टाकून त्यांना या कडक उन्हात वाचवले जात आहे. यासाठी माळशेज च्या जंगलात 250 पेक्षा अधिक मजूर पावसाळ्यात लावलेल्या रोपट्यांना पाणी घालून ती वाढवत आहेत, असे मांजरे यांनी सांगितले.
थिटाबी, दिवानपाडा, शेवडी, शिसवेवाडी, आदी ठिकाणी केलेल्या वृक्ष लागवडी च्या रोपट्यांना पाणी घालून या उन्हाळ्यात वाढवत असल्याचेही मांजरे यांनी सांगितले.