डोंबिवली: येथील पुर्वेकडील राजाजी पथ, रामनगर, चिपळुणकर रोडवरील डॉमिनोझ पिझ्झा हॉटेलचे शटर आणि लॉकर बनावट चावीने उघडून ८० हजार २७५ रकमेची रोकड लंपास करणा-या चोरटयाला रामनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. विजय मन्तोडे (वय २९ ) असे आरोपीचे नाव असून त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
सोमवारी चोरीप्रकरणी तक्रार दाखल झाली होती. रामनगर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत भराडे, पोलिस हवालदार सचिन भालेराव, विशाल वाघ, पोलिस नाईक हनुमंत कोळेकर, पोलिस शिपाई शिवाजी राठोड, भुषण चौधरी यांच्या पथकाने २४ तासात संबंधित गुन्हा उघडकीस आणून आरोपी विजयला बेडया ठोकल्या. चोरीला गेलेल्या ८० हजार २७५ पैकी ४७ हजार ८०० रूपये हस्तगत करण्यात आले आहेत.कामावरून काढून टाकले होते
आरोपी विजयला दारूचे व्यसन होते. त्याने ज्याठिकाणी चोरी केली त्याच डोमिनोझ पिझ्झा हॉटेलात तो कामाला होता. परंतू दारू पिऊन कामावर येत असल्याने त्याला २० दिवसांपूर्वीच कामावरून काढले होते. दारूच्या व्यसनापायी तो कर्जबाजारी झाला होता. त्यात हाताला काम नाही. आधी त्या हॉटेलमध्ये कामाला असल्यामुळे त्याला तिथली संपूर्ण माहीती होती. त्याने कर्ज फेडण्यासाठी हॉटेलच्या लॉकरमधील कॅशवरच डल्ला मारून तेथून तो पसार झाला. परंतू हॉटेलमध्ये घुसताना त्याचा चेहरा सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला होता.