ठाणे : कळवा येथील एका १३ वर्षीय मुलीवर २२ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी समोर आली. अल्पवयीन मुलीने हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर संतप्त जमावाने नराधमास चोप देत कळवा पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेत ३४ वर्षीय महिलेने कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेची १३ वर्षीय पुतणी मंगळवारी दुपारी घराच्या बाजूला खेळत होती. त्यावेळी आरोपी महेश सखाराम कांबळे (२२) याने पीडित मुलीला तोंड दाबून जबरदस्तीने घोलाईनगर, कळवा येथील त्याच्या घरात घेऊन गेला. त्यानंतर या नराधमाने मुलीस जीवे ठार मारण्याची भीती दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने हा प्रसंग पालकांना सांगितल्यानंतर संतप्त जमावाने आरोपीस जबर चोप देऊन कळवा पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६ सह पोक्सो कायदा कलम ४,८ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.