मुंबई - शरीरसंबंधांकरिता पिच्छा पुरवला म्हणून अनुकूल (नाव बदलले आहे) या तरुणाचे गुप्तांग छाटून टाकण्याच्या प्रकार डोंबिवलीत घडला होता. छेड काढत असल्यामुळे एका महिलेने आपल्या मित्रांच्या मदतीने अनुकूलचे गुप्तांग कापले होते. गेल्या 4 दिवसांपासून मृत्युशी लढणाऱ्या अनुकूलचा अखेर जे.जे. रुग्णालयात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अटक केलेल्या अंबिकाची (बदललेल नाव) पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांकडून या प्रकरणातील गुंतागुंतीची उकल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अनुकूलचा अंबिकाच्या कन्येशी व भाचीशी चांगला परिचय असल्याची चर्चा असून त्याला असलेल्या विरोधातून तिने हे कृत्य केले किंवा कसे, या दृष्टिकोनातून तपास पुढे केला जाण्याची दाट शक्यता आहे. अनुकूलला धडा शिकवण्यास अंबिकाला मदत करणारा तेजस म्हात्रे हा बेरोजगार असून अंबिका व तेजस यांच्या संबंधांबाबतही पोलीस माहिती घेत आहेत. पोलिओ लसीकरण मोहिमेच्या निमित्ताने अंबिका व तेजसची गाठभेट झाली. पुढे त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यामुळेच अनुकूलला धडा शिकवण्याकरिता अंबिकाने तेजसची मदत घेतली का? तेजसचा तिच्या कुटुंबाशी नेमका काय संबंध आहे? अशा प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत. अनुकूलला मारहाण करून त्याचे गुप्तांग कापण्याच्या प्रकारात अंबिका व तेजस यांना सहकार्य करणारा प्रवीण केनिया हा ड्रायव्हर आहे. अंबिकाच्या विनंतीवरून तेजसने केनिया याची या कृत्याकरिता मदत घेतली, अशी माहिती चौकशीत उघड झाल्याचे समजते.
अनुकूल याला धडा शिकवण्याकरिता तुम्ही दोघे मला मदत करा. मात्र, मी पोलिसांकडे तुमच्या नावाची वाच्यता करणार नाही. गुन्हा स्वत:च्या अंगावर घेईन, असे अंबिकाने त्यांना सांगितले होते. मात्र, अनुकूलला झालेली गंभीर मारहाण पाहिल्यावर हे केवळ एका महिलेचे कृत्य असूच शकत नाही, असे लक्षात आल्याने पोलिसांनी अंबिकाची चौकशी केली असता तिने दोघांची नावे सांगितली. त्यामुळे अंबिका, तेजस व प्रवीण हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. अंबिकाने फसवल्याने आता त्या दोघांना पश्चात्ताप होत आहे. जसजशी चौकशीत प्रगती होत जाईल, तसतसा या प्रकरणावर प्रकाश पडेल, अशी पोलिसांना अपेक्षा आहे.
मेंदूला इजा झाल्याने तसेच गुप्तांग कापल्याने एम्स रुग्णालयात उपचार घेत असलेल्या त्या तरुणाच्या प्रकृतीत तसूभरही सुधारणा झालेली नाही. मेंदूला मार लागल्याने तो बेशुद्धावस्थेत असून गुप्तांग कापल्याने त्याचा रक्तस्राव सुरूच आहे. या रुग्णावरील उपचाराकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे डॉक्टरांनी सांगितले.
अंबिका हिने अटक झाल्यावर चौकशीत अनुकूल हा आपला शरीरसंबंधांकरिता पिच्छा पुरवत असल्याने आपण त्याला अद्दल घडवल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, अंबिकाच्या परिचितांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनुकूल याची अंबिकाच्या कन्येशी व त्यांच्या घरी येणाऱ्या तिच्या भाचीसोबत ओळख होती. ही बाब अंबिकाला खटकत असल्याने तिचा त्याच्यासोबत खटका उडत होता. त्या रागातून तिने हे कृत्य तर केले नाही ना, या दृष्टीने पुढील तपास होणार आहे.