भिवंडी : भिवंडी पालिका प्रशासनात वर्ग एक ते चारची ८३९ पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. अनेक वर्षांपासून भरती न झाल्याने वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर प्रभारी अधिकारी पदाची नियुक्ती देऊन प्रशासनाचा कारभार हाकावा लागत आहे. वर्ग चारमध्ये मोडणारे व सफाई कामगार म्हणून नियुक्ती असलेले सफाई कर्मचारी आज प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या सफाई कामगारांची वर्णी प्रभारी अधिकारी म्हणून केल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.
भिवंडी पालिका क्षेत्रात ४ हजार ३६२ पदे मंजूर असून त्यामध्ये वर्ग एकची ३२ तर वर्ग दोनची ५० पदे मंजूर आहेत. त्यापैकी वर्ग एकची १० व वर्ग दोन मध्ये ९ अशी १९ पदे भरली असून ६३ पदे रिक्त आहेत. ज्यामध्ये विभागप्रमुख, कार्यालय अधीक्षक यासह प्रमुख पदांचा समावेश असून या पदावर कित्येक वर्षे भरती न झाल्याने या पदांवर वर्ग तीन व चार मधील शैक्षणिक पात्रता असलेल्या कामगारांकडे या पदांची जबाबदारी सोपवली आहे. तर वर्ग तीन या लिपिक संवर्ग पदावरील ५१४ पदे रिक्त असल्याने या पदांवरती स्वच्छता कामगारांची वर्णी लावली आहे.
स्वच्छता कामगार पदावरील मंजूर २ हजार ४७० पदांपैकी २ हजार ३८२ पदे भरली गेली आहेत. परंतु स्वच्छता विभागात अवघे १ हजार १५० कामगार असून उर्वरित कामगारांपैकी ६०० कामगार हे कार्यालयीन कामावर आहेत. तर ३५० हून अधिक कामगार मृत्यू अथवा निवृत्ती घेतली आहे. या जागा अजूनही भरल्या नसल्याने शहराच्या स्वच्छतेचे काम १ हजार १५० कामगारांकडून करुन घेतले जात आहे.
--------------------------------------------
मंजूर पदाचा तक्ता
वर्ग - मंजूर - भरलेली - रिक्त
वर्ग १ - ३२ - १० - २२
वर्ग २ - ५० - ०९ - ४१
वर्ग ३ - ११०९ - ५९५ - ५१४
वर्ग ४ - ३१७१ - २९०९ - २६२
-----------------------------------------------
एकूण - ४३६२ - ३५२३ - ८३९