कल्याण : कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाऊन लागू केला जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनच्या भीतीपोटी खरेदीसाठी नागरिकांनी कल्याणच्या डी-मार्टमध्ये मंगळवारी एकच गर्दी केली होती. त्यामुळे डी-मार्ट व्यवस्थापनाने मॉल बंद करण्याचा निर्णय घेतला.
कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने वीकेंड लॉकडाऊन लागू केला. पहिला वीकेंड लॉकडाऊन लावूनसुद्धा रुग्णांची संख्या कमी झाली नाही. त्यामुळे १४ दिवसांचा लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत सरकार आहे. लॉकडाऊन लागण्याआधीच घरात लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी मंगळवारी डी-मार्टबाहेर एकच गर्दी झाली. याच डी-मार्टवर महापालिका व पोलीस प्रशासनाने यापूर्वी दोन वेळा कारवाई केली आहे. त्यामुळे आजची गर्दी पाहून कारवाई होण्याआधीच डी-मार्टच्या प्रशासनाने डी-मार्ट बंद केले. मात्र, प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली आहे. प्रशासनाकडून डी-मार्टच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. सोमवारी महापालिका प्रशासनाने कोरोना नियमांचे उल्लंघन करणारी चार दुकाने सील केली होती. लक्ष्मी मार्केटमधील एक दुकान, बाजारपेठ हद्दीतील पानेरी आणि बाबला साडी सेंटर, नांदिवली रोडवरील एक इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आणि एका भाड्याच्या दुकानाविरोधात कारवाई करण्यात आली होती. वीकेंड लॉकडाऊननंतर सोमवारी कल्याण कोळसेवाडी परिसरात खरेदीसाठी महिलांची गर्दी होती. त्याचबरोबर आंबिवली परिसरातील दुकानातही खरेदीसाठी गर्दी दिसून आली. कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे. मात्र, काही नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्याने त्याचा फटका नियम पाळणाऱ्यांनाही बसत आहे.
-----------------------------