डोंबिवली : दरवर्षी लाखो तरुण अमली पदार्थांच्या आहारी जाऊन आपल्या आयुष्याचे नुकसान करून घेत आहेत. एकदा अमली पदार्थांच्या आहारी गेल्यास त्यातून सुटका होणे फार कठीण होते. व्यसनांमुळे कधीही भरून न निघणारे आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक नुकसान होते. अशी युवा पिढी मग पैशांसाठी गुन्हेगारीकडे वळते, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विजय चिंचोले यांनी व्यक्त केले.
तरुणांना या गंभीर समस्येतून बाहेर काढण्यासाठी डॉ. चिंचोले, डॉ. भूषण पाटील आणि डॉ. अद्वैत जाधव या मानसोपचार आणि व्यसनमुक्ती तज्ज्ञांनी एकत्र येऊन टिटवाळा येथे मनसा व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माहितीपुस्तिकेचे अनावरण पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी नुकतेच जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात केले.
पोलिसांचा, गुन्हेगारीचा आणि पर्यायाने व्यसनांचा फार जवळचा संबंध आहे, म्हणूनच व्यसनांविषयी जागृतीसाठी नुकताच पोलिसांसाठी ऑनलाइन वेबिनार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मानसोपचार तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पानसरे यांनीही ऑनलाइनद्वारे संदेश दिला.
------------------