ठाणे : देशाचे अमृतमहोत्सवी वर्ष, प्रजासत्ताक दिन व आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त मानव मोरे व आयुष तावडे ह्यांनी सलग २४ तास पोहण्याचा विक्रम करुन त्यांना अनोखी सलामी दिली. महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे स्टारफिश स्पोटर्स फाऊंडेशनच्यावतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
२६ जानेवारी रोजी मानव व आयुष यांनी दुपारी १२.२५ वाजता पोहण्यास सुरूवात केली आणि २७ जानेवारी रोजी तब्बल २४ तासांनी म्हणजे दुपारी १२.२५ वाजेपर्यंत हा विक्रम केला. वैयक्तीक पद्धतीने दोघेही पोहोले. मानव एमसीसी कॉलेजमध्ये शिकत असून तो १८ वर्षांचा आहे तर आयुष १३ वर्षांचा असून एसईएस या शाळेत शिक्षण घेत आहेत. दोघांनी जिद्दीने हा विक्रम केला असून त्याआधी त्यांनी याचा सराव केला होता. दोघांचा हा विक्रम होताच सर्वांनी तिरंगा फडकवला. मानवने राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे तर आयुष तावडे यांनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तसेच सिंधुदुर्ग, विजयदुर्ग येथे होणाऱ्या सागरी जलतरण स्पर्धांमध्ये सहभाग घेवून त्या यशस्वी केल्या आहेत. दोन्ही जलतरणपटू प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाली जलतरणाचा सराव करीत आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या जलतरणपटूंवर सर्वंच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या जलतरणपटूंना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक व आमदार निरंजन डावखरे, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, सुधीर बर्गे, क्रिडा विभागाच्या उपायुक्त मिनल पालांडे, आंतरराष्ट्रीय जलतरण पटू मयंक चाफेकर, महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर, उपव्यवस्थापक रवि काळे तसेच, इतर ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.