डोंबिवली : कल्याण ग्रामीण मतदार संघातील मानाचा चषक म्हणून ओळखला जाणाऱ्या आमदार चषक २०१८ मध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंचे कौशल्य पणाला लागले असून आता कोणता संघ बाजी मारून आमदार चषकाचा किताब मिळवेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १३ ते १८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत शीळ येथील कोडब मैदानावर ग्रामीण भागातील सर्वच संघ प्रतिभावान खेळ दाखवून संघाला विजय मिळवून देण्यासाठी झटत आहेत. कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांच्या नावे असलेल्या आमदार चषक २०१८ स्पर्धेचे आयोजन शिवसेना युवासेना, अलिमकर ११ क्रिकेट क्लब शिळगाव, गावदेवी क्रिकेट क्लब शिळगाव, एस. बी. ग्रुप यांच्या माध्यमातून करण्यात आले असून १३ फेब्रुवारी रोजी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन पार पडले.
आमदार चषक २०१८ स्पर्धेत ४८ संघांनी प्रवेश घेतला असून दररोज ९ सामने खेळविण्यात येत आहेत. यामध्ये प्रथम पारितोषिक २ लक्ष ५० हजार व चषक, द्वितीय १ लक्ष ५० हजार व चषक, तृतीय ७५ हजार व चषक आणि चतुर्थ ५० हजार व चषक तसेच मॅन ऑफ द सिरीज फॉर व्हीलर गाडी, उत्कृष्ठ फलंदाज व गोलंदाज टू व्हीलर बाईक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मोबाईल फोन व लकी ड्रॉ म्हणून टू व्हीलर बाईक व दररोज मोबाइल फोन ठेवण्यात आलेली आहे. आमदार चषक २०१८ स्पर्धेसाठी अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या.आतापर्यंत या स्पर्धेत वाकलण, घेसर, उत्तरशीव, घारीवली व हेदुटणे हे संघ उपउपांत्य फेरीत दाखल झाले आहेत. ग्रामीण भागात अनेक अनेक उत्कृष्ट व अष्टपैलू खेळाडू असून या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक प्रतिभावान व नवोदित खेळाडूंना आपला खेळ दाखविण्याची संधी प्राप्त होत असते म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी प्रतिक्रिया कळवा - मुंब्रा विधानसभा युवा अधिकारी व या स्पर्धेचे आयोजक सुमित सुभाष भोईर यांनी या वेळी व्यक्त केली.