ठाणे : जिल्ह्यातून जात असलेला बडोदा-मुंबई (उरण) महामार्ग व मुंबई -नागपूर समृद्धी महामार्ग रुंदीकरणासाठी जमिनी संपादित करण्यास स्थानिक शेतकरी, ग्रामस्थांचा तीव्र विरोध सुरू आहे. यासह काढण्यात येणारे मोर्चे, रॅली, धरणे, आंदोलने, उपोषण आदी आंदोलने प्रजासत्ताक दिनापर्यंत रोखणे आवश्यक असल्याने ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मनाई आदेश जारी केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहावी, यासाठी २६ जानेवारीपर्यंतच्या रात्री १२ वाजेपर्यंत हा मनाई आदेश राहणार आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून हा आदेश जारी केला आहे. विविध पक्ष, संघटना, समाजाकडून आरक्षण, नोटाबंदी आदी कारणांखाली अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यानिमित्त नाराज घटकांकडून निदर्शने करण्याची शक्यता नाकरता येत नाही. कायदा व सुव्यवस्था राहावी, म्हणून हा मनाई आदेश लागू केला आहे. (प्रतिनिधी)
२६ जानेवारीपर्यंत मनाई आदेश
By admin | Published: January 14, 2017 6:17 AM