ठाणे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गणेशोत्सव काळात विसजर्नाच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची ॲन्टिजेन चाचणी केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली आहे. यासाठी महानगरपालिका प्रत्येक विसर्जन केंद्रांवर ॲन्टिजेन चाचणी केंद्र उभारणार आहे. यासाठी जवळपास ५० हजार ॲन्टिजेन किट तयार ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका भवन येथे सार्वजनिक गणोशोत्सवच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या विविध कामांचा शर्मा यांनी गुरुवारी आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता अजरुन अहिरे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विसर्जन घाट
श्री गणोश मूर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे या दृष्टिकोनातून महापालिकेच्या वतीने पारसिक रेतीबंदर, कोलशेत, कोपरी (चेंदणी कोळीवाडा) कळवा पूल (निसर्ग उद्यान), कळवा (ठाणे बाजू), बाळकूम घाट आणि दिवा घाट असे एकूण सात विसर्जन घाट तयार केले आहेत. या ठिकाणी छोट्या गणेशमूर्तींबरोबर मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था केली आहे. निर्माल्य कलशाच्या व्यवस्थेबरोबरच नागरिकांना श्री गणेश विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था, भक्तांच्या वाहनांसाठी वाहनतळ, पाणबुडी पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आणि प्रसाधनगृह अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.