कल्याण : कल्याण ते कसारा रेल्वेमार्गावर तिसरी आणि चौथी लाइन विकसित करण्यासाठी जमीन संपादन करण्यासाठी थेट खरेदीची प्रक्रिया राबविली जात होती. तीस अल्प प्रतिसाद मिळत असल्याने येत्या आठवड्यात सक्तीने जमीन संपादनाची प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती कल्याणचे उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांनी गुरुवारी दिली. त्यामुळे प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया गतमान होऊन संपादनाची प्रक्रिया पूर्ण होताच प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याण ते कसारा रेल्वे मार्गादरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी लाइन विकसित करण्यासाठी ९,८४ हेक्टर जमीन संपादित करायची आहे. या प्रकल्पात बेरे, राये, पितांबरे, वावेघर, खडवली, बल्याणी, गुरवली, चिंचवली, मोस, मोहने, आंबिवली, मांडा, अटाळी, चिकणघर या गावातील जमीन बाधित होत आहे. यामध्ये सात-बाराचे २२८ गट आहे. जमीन संपादनाकरिता उपविभागीय कार्यालयाकडून जमिनीच्या थेट खरेदीची प्रक्रिया राबविली गेली होती. त्यास अत्यल्प प्रतिसाद आला. २२८ पैकी केवळ पाचच गटांचे संपादन करण्यात आले आहे. हा रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी भूसंपादन तातडीने होण्याकरिता थेट खरेदीची प्रक्रिया राबविली होती. मात्र, त्यातून संपादन होत नसल्याने आत्ता सक्तीचे भूसंपादन केले जाणार आहे. त्याची सुरुवात येत्या आठवडाभरात केली जाईल.
कल्याण-कसाराप्रमाणेच कल्याण-बदलापूर याठिकाणीही रेल्वेची तिसरी लाइन विकसित करण्यासाठी २५ एकर जागा संपादित करायची आहे. त्यासाठीही जमीन खरेदीची थेट प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्या ठिकाणीही प्रतिसाद कमी असल्याने तिथेही सक्तीचे संपादन केले जाणार आहे.
याच धर्तीवर कल्याण-शीळफाटा रस्त्याच्या सहा पदरीकरणाकरिता ७.१२ हेक्टर जमीन संपादित करायची आहे. या रस्त्याच्या सहा पदरीकरणात निळजे, काटई, नेतिवली, कचोरे, सागव, सोनारपाडा, घारीवली, मानगाव याठिकाणची जमीन बाधित होणार आहे. सध्या या रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. तो यापूर्वी चौपदरी होता. सध्या अस्तित्वात असलेल्या चौपदरी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू आहे. मात्र, सहाव्या पदरीकरणासाठी आवश्यक असलेल्या जागेकरिताही जमीन संपादनाची प्रक्रिया येत्या आठवड्यात सुरू केली जाईल. रेल्वे आणि रस्ते प्रकल्पासाठी सक्तीचे भूसंपादन करून संपादनाची प्रक्रिया येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष्य डोळ्य़ांसमोर ठेवण्यात आल्याचे भांडे-पाटील यांनी सांगितले.
नुकसान भरपाईसाठी ३०० कोटींची तजवीज
रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनात बाधित होणाऱ्यांकरिता जवळपास २०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची तजवीज केली जाणार आहे. त्याचप्रमाणे कल्याण-शीळ रस्त्याच्या सहा पदरीकरणात बाधित होणाऱ्यांकरिता १०० कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची तजवीज केली आहे.
--------------------------------------------