वसंत पानसरेकिन्हवली: शहापूर तालुक्यातील श्री क्षेत्र टाकेश्वर परिसरातील मानेखिंड ग्रामपंचायतीतील सर्वच गावपाड्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. पाण्याच्या टंचाईमुळे महिला तसेच इतर ग्रामस्थांचा संपूर्ण दिवस केवळ पाणी भरण्यासाठी जातो. यामुळे रोजगाराची इतर कुठलीही कामे न करता फक्त पाणी भरण्यासाठी वणवण फिरणे हेच काम त्यांच्यामागे लागले आहे.
काही सेवाभावी नागरिकांमार्फत येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या वतीने कूपनलिका बसवण्यात आल्या आहेत. परंतु, पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पाणी कमीच येत आहे.
शहापूर तालुक्यात किन्हवली जिल्हा परिषद गटातील मानेखिंड, साखरवाडी, भल्याचीवाडी, कवटेवाडी, आंबेखोर पठार, कुंभाईचीवाडी, टाकीचीवाडी आणि मधलीवाडी येथे तीव्र पाणीटंचाई असून महिलांना रात्रभर जागून तीन ते चार किमी अंतरावरून पाणी आणावे लागतेआहे. याबाबत, जिल्हा परिषद सदस्या कांचन साबळे, पंचायत समिती सदस्या शारदा रसाळ, पंचायत समिती कनिष्ठ सहा. किशोर गायकवाड यांच्या प्रशासकीय स्तरावरील प्रयत्नाने येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. परंतु, टँकर दिवसाआड येत असल्याने नागरिकांना टंचाई भेडसावते आहे. जनावरांनादेखील पाण्यासाठी भटकावे लागत असून काही जनावरांचा पाण्याअभावी मृत्यूदेखील झाला.
साखरवाडी, भल्याचीवाडी, कवटेवाडी, टाकेश्वर येथेही कूपनलिका बसवल्या आहेत. आदिवासी जनतेला पाणीटंचाईपासून थोडासा दिलासा मिळाला आहे. येथील मानेखिंड ग्रामपंचायत परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. काही ठिकाणी कूपनलिका मारून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. - किशोर गायकवाड, कनिष्ठ सहायक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, शहापूर पंचायत समिती