उल्हासनगर : महापालिका प्रभाग क्र.-१ (ब) पोटनिवडणुकीत रिपाइंच्या मंगल वाघे यांनी भाजप-शिवसेना, साई व ओमी टीम महाआघाडीच्या वनीता भोईर यांचा दणदणीत पराभव केला. भोईर यांच्या पराभवाने भाजप-शिवसेना, ओमी टीम व साई पक्षात आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले असून ओमी कलानी यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्याचे बोलले जाते.उल्हासनगर महापालिका प्रभाग क्र.-१ मध्ये भाजपाच्या पूजा भोईर यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यावर २३ जून रोजी पोटनिवडणूक झाली. ओमी टीमच्या वनीता भोईर भाजपच्या तिकिटावर, रिपाइंचे मंगल वाघे व काँग्रेसचे नितीन मेश्राम यांच्यात तिरंगी लढत झाली. पालिका मुख्यालयात झालेल्या मतमोजणीत रिपाइंचे मंगल वाघे यांना २६३७, भाजप आघाडीच्या वनीता भोईर यांना २३२४, तर काँग्रेसचे नितीन मेश्राम यांना फक्त १७३ मते मिळाली. रिपाइंचे वाघे ३१३ मतांनी विजयी झाले.शिवसेना-भाजपच्या बालेकिल्ल्याला रिपाइंने खिंडार पाडले असून पराभवाचा राजकीय धक्का ओमी कलानी यांना बसला. कलानी यांना स्थानिक राजकारणात एकाकी पाडण्यासाठी भाजप, शिवसेना व साई पक्षाच्या नेत्यांनी रिपाइंच्या मंगल वाघे यांचा छुपा प्रचार केल्याची चर्चा सुरू झाली. हा आरोप बिनबुडाचा असल्याची प्रतिक्रिया भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी दिली.विधानसभेकरिता दावाउल्हासनगरात रिपाइंची मोठी ताकद आहे. पप्पू कलानी यांच्या रूपाने पक्षाला येथूनच आमदार मिळाला. यापूर्वी रिपाइंच्या मालती करोतिया यांनी महापौर, तर पंचशीला पवार यांनी उपमहापौरपद भूषवले होते. विधानसभा निवडणुकीत येथून रिपाइंला उमेदवारी द्यावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे शहराध्यक्ष भगवान भालेराव यांनी सांगितले.
उल्हासनगरात रिपाइंचे मंगल वाघे विजयी, ओमी कलानींना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 6:21 AM