टिटवाळा-: एरणाकुलम येथून निजामुद्दीनकडे जाणारी मंगला एक्सप्रेस मेलच्या इंजिनमध्ये टिटवाळा स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने टिटवाळा, आसनगाव, कसारा या अपडाउन मार्गावरची रेल्वेसेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. याच मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्यात आले आहेत. त्यामुळे कल्याण-कसारा या रेल्वे मार्गावर टिटवाळा, आंबिवली व शहाड रेल्वे स्थानक दरम्यान रेल्वे गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.
टिटवाळा स्थानकात दुपारी २:१५ वा. आलेल्या मंगला एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या एरणाकुलमवरुन निजामुद्दीनकडुन जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रीक बिघाड झाल्याने कल्याण- कसारा मार्गावरील लोकल व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. दरम्यान दुपारी १:५० कसारा लोकल देखील रद्द करण्यात आली.
यानंतर मागोमाग येणाऱ्या सर्वच गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवासी वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. दरम्यान खडवली स्थानका वरुन इंजिन मागविण्यात आले, त्यांनंतर ३:४५ वाजता रेल्वे सेवा पूर्ववत झाली असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.