ठाणे : येत्या वर्षभरावर आलेली ठाणे महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्तेत असलेल्या शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपने अखेर महापालिकेतील गटनेतेपदी मनोहर डुंबरे यांच्या गळ्यात माळ टाकली आहे. गुरुवारी झालेल्या महासभेत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
ठाणे महापालिकेच्या निवडणुका येत्या वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. शिवसेनेने शून्य भाजप मोहीम हाती घेतली आहे. भाजपची एकही जागा निवडून येता कामा नये यासाठी शिवसेनेने रणनिती आखली आहे. यामुळे सत्ताधारी शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपनेदेखील कंबर कसून काही दिवसांपासून गटनेतेपदाचा शोध सुरू केला होता. संजय वाघुले यांचा गटनेतेपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांच्या जागी अनेक नावांची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्या जागेवर आता कोणाची निवड होणार याकडे लक्ष लागले होते. यात नगरसेवक मिलिंद पाटणकर यांच्यासह नारायण पवार, अशोक राऊळ यांची नावे आघाडीवर होती. परंतु, भाजप श्रेष्ठींनी अखेर डुंबरे यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ टाकली.
तीन वर्षातच मारली मोठी मजल
डुंबरे हे एक अभ्यासू, उच्चशिक्षित आहेत. मागील दोन टर्म ते नगरसेवक म्हणून घोडबंदर भागातून निवडून आलेले आहेत. राजकारणाचे बाळकडू त्यांना बालपणापासूनच मिळालेले आहेत. त्यामुळे राजकारणाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. शिवाय ते निरंजन डावखरे यांचे निकटवर्तीदेखील समजले जातात. २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत ते राष्ट्रवादीतून भाजपमध्ये डेरेदाखल झाले. त्यानंतर प्रत्येक महासभेत सत्ताधाऱ्यांकडून आलेल्या चुकीच्या विषयांवर त्यांनी आगपाखड केल्याचेही दिसत होते. शिवाय आगामी वर्षभर ते शिवसेनेला टक्कर देतील, असा विश्वास श्रेष्ठींनी त्यांच्यावर ठेवला आहे. त्यामुळेच त्यांची निवड झाल्याचे बोलले जात आहे.