ठाणे: मानपाडा दोस्ती, एक मे, इम्पेरिया येथील नागरिक सुविधांबाबत नरकयातना भोगत आहेत. परिसरात घाणीचे साम्राज्य, ड्रेनेजचे पाणी, लिफ्ट बंद, पिण्याच्या पाण्याचा अभाव शिवाय बोअरिंगलाही पाणी नाही अशा अनेक सुविधांबाबत येथील रहिवासी त्रस्त आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी लसीकरणाचे राजकारण करण्यापेक्षा नागरिकाच्या मूलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली.
येथील नागरिकांच्या तक्रारींनुसार केळकर यांनी तातडीने ठामपाचे नगर अभियंता अर्जुन अहिरे यांच्यासह अधिकारी वर्गास बोलावून एकत्रित चर्चा केली. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने लिफ्टचे काम, परिसरातील स्वच्छता, ड्रेनेज, पिण्याचे पाणी व बोअरिंग आदी कामे त्वरित करून द्यावीत अशा सूचना केल्या.
या ठिकाणी अनेकांनी आपल्या खोल्या भाडेतत्त्वावर दिल्या आहेत, स्थावर मालमत्ता विभागाचेही दुर्लक्ष आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी करूनसुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्याचेही केळकर यांनी निदर्शनास आणले. या बाधित लोकांच्या समस्या महापालिकेने तातडीने जर सोडविल्या नाहीत तर पुढील काळात त्यांना एकत्रित करून महापालिकेवर लाँग मार्च काढण्यात येईल, असा इशारा दिला.