ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठाणे, मानपाडा नगराचे संघचालक प्रभाकर लक्ष्मण जोशी यांचे कोरोनाची बाधा झाल्याने शनिवारी रात्री दहाच्या सुमारास निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय अठ्याहत्तर होते. रा.स्व.संघाच्या वर्तुळात अण्णा म्हणून परिचित असलेले प्रभाकर जोशी त्रास होत असल्याचे लक्षात येताच स्वतःहून ठामपा संचालित ग्लोबल रुग्णालयात दाखल झाले होते. आपण लवकरच घरी येऊ असे त्यांनी कार्यकर्त्यांना कळवले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्यावर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी ते व्हेंटिलेटरवर होते. शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. रात्री उशिरा त्यांच्यावर वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
2002 पासून ठाण्यात वास्तव्याला असलेले अण्णा उपाख्य प्रभाकर जोशी जिल्हा सत्र न्यायाधीशपदावरून निवृत्त झाले होते. मूळचे जळगाव येथील प्रभाकर जोशी यांनीआपले शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली होती. त्यानंतर प्रभाकर जोशी यांनी कायद्याचा अभ्यास पूर्ण करून त्यांनी वकिलीला सुरूवात केली होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय वर्ष शिक्षित असलेल्या अण्णा जोशी यांनी निवृत्तीनंतर रा.स्व.संघाच्या कामात स्वतःला झोकून दिले होते. येथील मानपाडानगराचे संघचालक म्हणून कार्यरत असणारे अण्णा सामान्यस्वयंसेवकांच्या पालकत्वाची भूमिका आपुलकीने पार पाडत होते. दिलखुलास व्यक्तिमत्वाच्या अण्णांचा हात सदैव मदतीसाठीपुढे असायचा. तरुणाईशी मोकळेपणाने संवाद साधण्यात त्यांचा पुढाकार होता. कुठल्याही कामासाठी या प्रभाकर लक्ष्मण जोशी कडे निःसंकोचपणे कधीही यायचे,असे त्यांचे सांगणे होते.
नव्याने रा.स्व.संघाच्या कामात सक्रिय होणाऱ्या तरुणांची मनातील मोकळेपणाने बोलण्याची हक्काची जागा म्हणजे अण्णा जोशी असे समीकरण होते. अण्णा यांच्या निधनाने चैतन्याचा स्तोत्र आणि उत्साहाचा झरा असलेले पितृतुल्य व्यक्तिमत्व हरपल्याची भावना सामान्य स्वयंसेवकांची आहे. प्रभाकर उपाख्य अण्णा जोशी यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे.