शहापूर : कोणत्याही देशाचे मनुष्यबळ ही त्याची फार मोठी शक्ती असते. किंबहुना, ती एक प्रकारे राष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक असते. त्याचे फळ मिळण्यास दीर्घकाळ लागतो. त्यामुळे मानवी कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कजाकिस्तानमधील स्टेट टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका नोना लिफारेवा यांनी केले. शहापुरातील ज्ञानवर्धिनी संचालित सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयात बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कजाकिस्तानमधील अनेक उद्बोधक उदाहरणे देत त्यांनी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करून शिक्षण आणि संशोधनाचा फायदा आपल्या राष्ट्राला करून द्यावा, असे आवाहन उपस्थितांना केले.येमेन या देशातील प्रा. नबील व प्रा. मोहमद हे उपस्थित होते. प्रा. नबील यांनी भारत हा नागरिकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देणारा देश असल्याचे म्हटले. तसेच विद्यार्थ्यांनी माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासारखे संशोधन करून भारताचे नाव जगभरात मोठे करावे, असे आवाहन केले. तर, प्रा. मोहमद यांनी भारताला उत्कृष्ट संशोधकांचा वारसा लाभला असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे सांगितले. येथील ज्ञानवर्धिनी संचालित सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय आणि कल्याण येथील एमजीईडब्ल्यू सोसायटीचे सेंटर फॉर हुमिनिटीज अॅण्ड कल्चरल स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या परिषदेचे उद्घाटन ‘ज्ञानवर्धिनी’ या संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष किशोर कडव यांच्या हस्ते झाले. या परिषदेत मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र, सर्व सामाजिक शास्त्रे, वाणिज्य शाखेतील सर्व विषय, विज्ञान शाखेतील सर्व विषय, माहिती तंत्रज्ञान, ग्रंथालयशास्त्र व इतर अनेक विद्या शाखांतील विविध विषयांचे शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध महाविद्यालयांतील व विद्यापीठांतील तज्ज्ञ प्राध्यापकांनी सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. बी.व्ही. शिंदे यांनी केले. (वार्ताहर)
मनुष्यबळ ही राष्ट्राची मोठी गुंतवणूक
By admin | Published: April 18, 2017 3:23 AM