डोंबिवली- जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी आणि नागरिकांना योग्य पद्धतीने उपचार मिळावा यासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचा आढावा घेण्यात यावा. तसेच प्रत्येक शहरातील लोकसंख्येनुसार आरोग्य व्यवस्था कशी असावी, शासकीय अथवा पालिका संचलित रुग्णालयामध्ये अपुरे मनुष्यबळ असल्यास त्या जागी मनुष्यबळ वाढविणे याबाबत कार्यवाही करण्यात यावी. तर या संपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या देखरेखीखाली समिती नेमण्यात यावी. अशी मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. ठाणे जिल्हा नियोजन भवन जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत खासदार डॉ. शिंदे यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी या महत्वाच्या विषयाची मागणी केल्याचे बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. त्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यावर लवकरच समिती नेमण्यात येणार असून त्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.
ठाणे जिल्ह्यातील विविध स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आणि राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत खासदार डॉ. शिंदे यांनी जिल्ह्यासाठी तसेच कल्याण लोकसभा मतदार संघासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी विविध उपायोजना राबविण्याचे महत्वाचे असल्याचे यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. यासाठी यासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचा आढावा घेण्यात यावा. तसेच प्रत्येक शहरातील लोकसंख्येनुसार आरोग्य व्यवस्था कशी असावी, स्थानिक शासकीय अथवा पालिका संचलित रुग्णालयामध्ये अपुरे मनुष्यबळ असल्यास त्या जागी मनुष्यबळ वाढविणे याबाबत कार्यवाही करण्यात यावी. तर या संपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या देखरेखीखाली समिती नेमण्यात यावी. या समितीच्या माध्यमातून येणाऱ्या अहवालातून जिल्ह्यातील रुग्णालय अधिक सक्षम बनविण्यात यावे. असे महत्वाचा विषय यावेळी बैठकीत उपस्थित केला. यावर पालकमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत तातडीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. याच बरोबर खासदार डॉ. शिंदे यांनी विविध महत्वाच्या विषयांचे प्रस्ताव मांडत त्यावर कार्यवाही करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. यामध्ये टीडीआरएफ ( ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दल) या धर्तीवर जिल्ह्यातील प्रत्येक महापालिकेची स्वतंत्र अशी टीम तयार करावी. यामुळे रोजगार उपलब्ध सह आपत्कालीन स्थितीत मोठी मदत नागरिकांना होईल. आपत्ती व्यवस्थापना मध्ये या टीमची मोठी मदत होईल. इर्शाळवाडीसारख्या दुर्घटनेवेळी या दलांचा मोठा फायदा होतो. यामुळे या दलांच्या निर्मितीसाठी कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी केली.
ठाणे तालुक्यातील नागाव येथे महानंद डेअरी साठी राज्य शासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे मात्र तेथे अद्याप कोणताही प्रकल्प उभारण्यात आला नाही. त्या जागेवर दुसरा प्रकल्प उभारण्याची कार्यवाही सुरू करावी. याबाबत जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. तसेच जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामे हटविण्याबाबत स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांनी तातडीने आणि गांभीर्याने कारवाई करावी. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न महापालिका आयुक्तांनी गांभीर्याने घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी यासाठी कोणत्याही प्रकारचे कागदी सोपस्कार पार पाडू नये थेट कारवाई करत अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात यावी अशा सूचना ही यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येला मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रस्तावित असलेल्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कुशीवली धरणाचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा. यासाठी जिल्हा प्रशासन पाट बंधारे विभागाने तातडीने कार्यवाही करावी अशीही मागणी यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी केली.ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि मुरबाड येथे कोयना बाधितांसाठी जाग राखीव ठेवण्यात आली आहे. बाधितांना घर उभारणीसाठी जागा आणि शेतजमीन देण्यात आली होती. मात्र आज धरण बांधून ५६ वर्षांहून अधिक काळ लोटला असूनही बाधितांना त्यांच्या हक्काची जागा मिळालेली नाही. यातील ठाणे आणि भिवंडी तालुक्यात असलेल्या राखीव शेत जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी भंगाराची गोदामे तसेच इतर अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत तातडीने राखीव जागांवरील अतिक्रमण हटविण्याबाबत कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीने गेल्यावर्षी ठाणे तालुक्यातील पिंपरी गावातील राखीव जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आले होते. या कारवाईला आता एक वर्षाहून अधिकचा काळ लोटला आहे. मात्र अतिक्रमण हटवूनही बाधितांना हक्काची जागा उपलब्ध होऊ शकली नाही. याबाबतही निर्णय घेण्यात येऊन बाधित्यांना त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी. अशी महत्वाची मागणी यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी पालकमंत्र्यांकडे केली. यावर तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.