ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 12 - सरकारच्या धोरणांमुळे आणि दिलेली सर्व आश्वासने पुर्ण केल्यामुळे भाजपा नगरपालिका निवडणुकीत क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. पण भाजपाची खरी परीक्षा मुंबई, पुण्यासह होणाऱ्या 10 महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत असणार आहे,असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. ते ठाण्यात भाजपाच्या राज्य कार्यकरणी मेळाव्यात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसेंसह भाजपाचे दिग्गज नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना दानवे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. ' काँग्रेस, राष्ट्रवादीने बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकाची फक्त आश्वासनं दिली पण आम्ही ती पूर्ण केली.' नगरपालिका निवडणुकीत नोटाबंदी आणि मराठा मोर्चाचा विपरीत परिणाम झाला नाही असेही ते म्हणाले.
बेईमानी करणाऱ्या भाजपला धडा शिकवा - शिवसेना
मुंबईसह राज्यातील दहा महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या १६५ पंचायत समित्यांची निवडणूक १६ फेब्रुवारीला तर दुसऱ्या टप्प्यात 10 जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या 118 पंचायत समित्यांची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून त्यासाठीची आचारसंहिता लागू झाली आहे. 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.